सोलापूर/महेश गायकवाडः-
भाजपकडून विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. बहुचर्चेत असलेल्या सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाला पहिल्या यादीत स्थान दिले आहे. परंतु मंगळवेढा आणि माळशिरस तालुक्यातील उमेदवार जाहिर करण्यात आले नाहीत यामुळे समाधान आवताडे आणि राम सातपुते यांची गोची झाली आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदावारी जाहीर झाली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. 99 जणांमध्ये अनेक विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. तर बहुचर्चेत असलेल्या सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाला भाजपाने पहिल्या यादीत स्थान दिले आहे.
शहर उत्तर मधून माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, दक्षिण सोलापूर माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख तर अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी यांना पून्हा विधानसभेची संधी देत भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर मध्ये बंडखोरी मोठया प्रमाणात वाढ झाली होती. विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमूख यांच्या विरोधात भाजपातील एका गटातील नाराज कार्यकर्त्यांनी बंड पुकारला होता. दोन्ही देशमुखांना उमेदवारी मिळू नये यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत बंडाचे लोण पसरले होते. रविवारी भाजपाच्या पहिल्या उमेदवारी यादीत दोन्ही देशमुखांचे नावे जाहीर झाल्याने बंडखोराना मोठा हादरा बसला आहे. विजयकुमार देशमूख सलग चार वेळा शहर उत्तर विधान सभेचे नेतृत्व करीत आहेत. सर्व जातीजमातीतील लोकांना सोबत घेऊन त्यांनी राजकारण केले आहे. विजयकुमार देशमूख हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.
दक्षिण सोलापूर मतदार संघातून सुभाष देशमूख सलग दोन वेळा आमदार झाले आहेत. सहकारमंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहीले आहे. भाजपातील नाराज गटांनी देशमुखांचा अपप्रचार केला मात्र तो प्रभावशाली ठरू शकला नाही. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सचिन कल्याणशेट्टी यांना दुसर्यांदा संधी देण्यात आली आहे. कल्याणशेट्टी विरोधात फारशी बंडखोरी दिसून आली नाही. कल्याणशेट्टी हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू मानले जातात.
नवख्या उमेदवाराला संधी नाही
सोलापूर शहर उत्तर, दक्षिण, अकलकोट विधानसभा मतदार संघातून नवख्या उमेदवारीची संधी देण्यात आली नाही. अनेक इच्छूकांनी विधानसभेची तयारी केली होती मात्र भाजपाच्या सर्व्हेत दोन्ही देशमुखांसह कल्याणशेट्टी नावे आघाडीवर होती.
विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना आता वेग असून विविध पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून पहिल्याच यादीत शहर उत्तर चे मालक अर्थांत विजयकुमार देशमुख, दक्षिण चे बापू अर्थात सुभाष देशमुख , आणि विकासाचा वादा आपल्या हक्काचा दादाअर्थात सचिन
कल्याणशेट्टी यांनाच संधी देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या पदरात निराशाच आली आहे . विद्यमान आमदारांनाच पुनश्च: भाजपा ने संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे. उत्तर मध्ये मालकांनी दक्षिण मध्ये बापूंनी तर अक्कलकोट मध्ये दादांनी केलेल्या विकासाच्या जोरावर तिघांनाही पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. यंदाची निवडणूक ही अहवानात्मक निवडणूक असून त्या अनुषंगाने तगड्या उमेदवारांनाच भाजपाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. उमेदवारी मिळताच सोशल मीडियावर *मालक ,* *बापू* , *दादा* यांची विशेष क्रेझ पाहायला मिळत आहे