पारंपारिक विरोधकच बहुतांशी ठिकाणी आमने-सामनेःबंडखोरीमुळे वाढली चुरस
कराड/प्रतिनिधीः-
राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत असून, सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघामध्ये बंडखोरी झाली असली तरी सध्या तरी सहा मतदारसंघात दुरंगी तर दोन ठीकणी तिरंगी लढतीची शक्यता असून हा सामना जोरदार होणार हे मात्र निश्चित झाले आहे. तरीही अर्ज माघारीचा चार नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असून त्यानंतर खर्या अर्थाने अंतिम लढती कशा असतील याचे चित्र स्पष्ट होईल.
सातारा जिल्ह्यातील आठ मतदार संघापैकी काही मतदारसंघात पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी एकमेकासमोर उभे ठाकले आहेत. तर काही ठिकाणी नवीन उमेदवार आपले नशिब अजमावत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या विधानसभा निवडणूकीत प्रामुख्याने सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्याच अमेदवारात खरी लढत होणार आहे. काही मतदार संघात बंडखोरीही झालेली आहे. त्यामुळे उमेदवारांचे निवडणूकीचे गणित बदलण्याची शक्यता आहे. पारंपारिक लढती या लक्षवेधी ठरणार आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे मात्र निश्चित.
सातारा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे महायुतीचे उमेदवार आहेत. दोन राजे एकत्रित ही निवडणूक पार पाडीत आहेत. त्यामुळे त्यांना सहज वाटणारी निवडणूक तिरंगी होत आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अमित कदम निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर याच पक्षातील एस.एस.पार्टे गुरूजींनी बंडखोरी केली आहे. उभाठा शिवसेनेतून झालेली बंडखोरी ही त्यांना मारक ठरणार की गणित बिघडवणार हे महत्वाचे आहे.
पाटण विधानसभा मतदासंघामध्ये अनअपेक्षित राजकीय घडामोडी घडत, पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या विरोधात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने हर्षद कदम यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, या उमेदवारीला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील सत्यजितसिंह पाटणकर यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पाटण हा मतदारसंघ पक्षांपेक्षा दोन गटातील लढतींमुळे चर्चेत असतो या ठिकाणी पाटणकर या पारंपारिक लढतीची कायमच चर्चा असते अशीच लढत पार पडत आहे. मात्र, यावेळी तिरंगी लढत होत असली तरी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या पाटणकरांना तिकीट नाकारल्याने मोठी सहानभूती मिळाल्याचे उमेदवारी अर्ज भरताना पहायला मिळाले, यामुळे ही निवडणूकही अत्यंत चुरशीची पार पडणार हे मात्र निश्चित.
फ लटण मतदारसंघामध्ये निवडणूकीपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अजितदादांच्या बरोबर गेलेल्या आ.दिपक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर होवूनही त्यांनी उमेदवारी नाकारत शरद पवार यांच्या बरोबर जाणे पसंत केले. या ठिकाणी त्यांनी तुतारी हातात घेताना रामराजे नाईक निंबाळकर हे तटस्थ राहिले मात्र, त्यांचे बंधू संजिवराजे नाईक-निंबाळकर व पिंटूबाबांनी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करत आ.दिपक चव्हाण यांनाच उमेदवारी दिली. याला टक्कर देण्यासाठी मा.खा.रंजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जोरदार प्रतिउत्तर देत महायुतीच्या माध्यमातून पण अजितदादा यांच्या राष्ट्रवादीतून सचिन कांबळे यांना रिंगणात उतरवले असल्याने काटेकी टक्कर अपेक्षीत आहे.
माण मतदारसंघात विद्यमान आमदार जयकुमार गोरे चौथ्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादीकडून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी देत, गतवेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रभाकर देशमुख आणि अनिल देसाई यांनी माघार घेत घार्गेंच्या बरोबर राहत असल्याचा निर्णय घेतला आहे. पण येथे उद्धव ठाकरे सेनेतील नाराज शेखर गोरे यांची भूमिका निर्णांयक ठरेल. ते आपल्या बंधूला मदत करतात का? का कोणाच्या पारड्यात आपली मते टाकतात हे महत्वाचे ठरणार आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन शिंदे आमदारांच्यात लढत होत आहे. ही लढत अत्यंत निर्णायक स्थितीत पार पडेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे निवडणूक रिंगणात अहेत तर, शिवसेना शिंदे गटाकडून महेश शिंदे रिंगणात उतरले आहेत. या ठिकाणी महायुतीचे नेते व माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदेंच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूकीत व्टिस्ट निर्माण झाला आहे.
कराड उत्तर मतदारसंघात माजीमंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांची या मतदारसंघावर पकड चांगली आहे. मात्र यापूर्वीच्या निवडणूकीमध्ये तिरंगी लढती झाल्याने त्यांना सहज निवडणूक जिंकणे सोपे झाले होते. यावेळी मात्र त्यांना एकास-एक लढत द्यावी लागणार आहे. भाजपाकडून मनोज घोरपडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या मदतीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, रामकृष्ण वेताळ हे असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार हे मात्र निश्चित. हीच स्थिती कराड दक्षिणमध्ये काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपाचे नेते अतुल भोसले यांच्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून आणि दुरंगी होत आहे.
वाई विधानसभा मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून आ.मकरंद पाटील मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार यावर चर्चा रंगत असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने माजीमंत्री स्व.मदनराव पिसाळ यांच्या सून अरूणादेवी पिसाळ यांना उमेदवारी देवून या निवडणूकीत चुरस निर्माण केली आहे. या ठिकाणी माजी आमदार मदनदादा भोसले जरी महायुतीत असले तरी त्यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. या मतदासंघात दुरंगी होणारी निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेल्या शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी शिंदेसेनेला रामराम करत बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे या मतदारसंघात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.