एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत आहे. नवे सरकार कधी स्थापन होणार, मंत्रिमंडळ कसे असणार, कोणाकडे कोणती खाती जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मन की बात बोलून दाखवली. तसेच भाजपाचा मुख्यमंत्री करण्याचा मार्गही मोकळा केला.
ना एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणुकीत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केले. मी पहाटेपर्यंत काम करायचो. दोन तीन तास झोपल्यावर माझी सभा असायची. हे चक्र निवडणुकीभर चालले. मी ८० ते ९० सभा घेतल्या. मी प्रवासही मोठा केला. मी कार्यकर्ता म्हणून काम केले. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही करत आहे. मी मुख्यमंत्री समजलो नाही. कॉमन मॅन म्हणून काम केले. नाराज होऊन आम्ही रडणारे नाही. तर जनतेसाठी काम करणारे आहोत. रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करेन. महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाइड व्हिक्ट्री आहे. गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नाही. जे काही अडीच वर्षात महायुतीने जे काम केले, लोकांनी जो विश्वास दाखवला. त्यामुळे हा विजय झाला. हा जनतेचा विजय आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
लाडका भाऊ ही ओळख मोठी
सत्तास्थापनेचे घोडे कुठेही अडलेले नाही. मी मनमोकळा माणूस आहे. मी कुठेही काहीही धरून ठेवलेले नाही. मी कुठलीही गोष्ट ताणून धरणारा माणूस नाही. मला इतर सर्व पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ हीच ओळख जास्त प्रिय आहे. मला अडीच वर्षे राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी आभारी आहे. भाजपने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घ्यावा, त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांसोबत फोनवर चर्चा झाली. त्यांना मी सांगितले की, सरकार बनवताना माझा कोणताही अडसर येणार नाही, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. तुम्ही आम्हाला मदत केली, अडीच वर्षे संधी दिली. आता तुम्ही निर्णय घ्या, तो निर्णय मला महायुतीचा प्रमुख म्हणून मान्य असेल. भाजपचे वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील, ज्याला मुख्यमंत्री करतील, त्याला पूर्ण शिवसेनेचे समर्थन आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत, नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल, उपमुख्यमंत्री की गृहमंत्री की आणखी काही, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, उद्या दिल्लीत आमची तिन्ही पक्षांच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक होणार आहे. महायुतीचे सरकार स्थापन करण्याबाबत साधक-बाधक चर्चा होईल. या बैठकीत सगळ्यावर चर्चा होईल. त्या चर्चेतून सगळे प्रश्न सुटतील. उपमुख्यमंत्री होणार की आणखी काही ते उद्या ठरेल, असे एकनाथ शिंदे म्हणालेत.