7 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

वैभव नाईक शिवसेनेतच

अग्रलेख / दि. १८ फेब्रुवारी २०२५

 

वैभव नाईक शिवसेनेतच

 

सध्या शिवसेना शिंदे पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्ष यांच्यात कलगी तुरा सुरू आहे. याचे कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेतून बंडखोरी करून नवीन शिवसेनेचा गट उभारला. नंतर न्यायालाय व निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख झाले. परांटी शिंदे यांची बंडखोरी उद्धव ठाकरे यांना कधीच रुचली नव्हती. त्यामुळे दोन्ही नेत्यांत कायम शाब्दिक बाचाबाची झालेली दिसून येते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आयारामांची गर्दी पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून अनेक जण जात आहेत. असे असले तरी बाळासाहेबांची शिवसेना आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना मानणारे अनेक आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोकणाने पक्षाच्या रूपात मोठ्या प्रमाणात ताकद दिली होती. परंतु सध्या काहींनी ठाकरे शिवसेनेला धक्का दिला असतांनाच माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, मी साथ सोडणार नाही असे वचन दिले आहे. या दरम्यान बोलताना नाईक यांनी म्हटले आहे की, नवी उमेद आणि नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्षबांधणी करु. आमदार वैभव नाईक हे उद्धव ठाकरे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत.

राजापूरचे माजी आमदार राजन साळवी, रत्नागिरी चे माजी आमदार सुभाष बने तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही पदाधिकार्‍यांनी शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत वातावरण ढवळून निघाले आहे. माजी आमदार वैभव नाईक यांना एसीबीच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. तरीही नाईक यांनी आपण उध्दव ठाकरे यांची साथ सोडणार नाही असे म्हटले आहे. विरोधकांवर तपास यंत्रणेचा दबाव आणून त्यांना आपल्या पक्षात सामील करण्याचे तंत्र भाजपने विकसित केले आहे. तसेच तपास यंत्रणांचा ससेमिरा आपल्या पाठीशी लागू नये म्हणून अनेक जण महायुतीमधील सहभागी पक्षांत जात असल्याचे दिसते. वैभव नाईक हे कट्टर राणेविरोधी असून त्यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र या चर्चेतील तपशील समजू शकला नाही. वैभव नाईक यांनी आपण उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष नव्याने बांधणी करण्यावर भर देत आहे असे म्हटले आहे.

शिवसेना शिंदे गटात वैभव नाईक प्रवेश करतील असा होरा लोकसभा, विधानसभा निवडणुकीपुर्वी बांधला जात होता.  मात्र वैभव हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहीले. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात दोन वेळा प्रतिनिधित्व त्यांनी केले. तिसऱ्यांदा ते विजयी झाले नाहीत. या पराभवानंतर प्रथमच ते मातोश्रीवर दाखल झाले. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे ते कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. कोकणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवसेनेला पूर्वीचे दिवस दाखवून देण्याची इच्छा वैभव नाईक यांची असल्याचे दिसते. नारायण राणे यांचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय वैर आहे. ते पूर्वीपासूनच आहे. वैभव नाईक यांचे आणि नारायण राणे यांचे पटणे शक्य नाही. २५ वर्षांपूर्वी वैभव नाईक यांचे वडील विजय नाईक हे राजकारणात होते. तेव्हापासून नारायण राणे कुटुंबीयांशी राजकीय वैर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदार संघातून वैभव नाईक यांनी नारायण राणे आणि नीलेश राणे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांचे वर्चस्व होते. वैभव नाईक यांनी शिवसेनेत राहुल त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला होता. तसेच कुडाळ मतदार संघात शिवसेनेला जिंकून दिले होते. वैभव नाईक हे राणे कुटुंबियांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून पुन्हा एकदा शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्याचे योजले असावे असे वाटते. सध्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासमोर मुंबई महापालिका निवडणुकीचे मोठे आव्हान आहे. तसेच पक्षातून बाहेर सत्तेकडे जाणार्‍या नेत्यांची डोकेदुखी झाली असताना वैभव नाईक हे त्यांच्यासाठी वाळवंटातील हिरवळ असे म्हणावे लागेल. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेबांना मानणारे निष्ठावंत आहेत. वैभव नाईकही त्याच निष्ठावंतांपैकी एक आहेत. कोकणातील शिवसेना उद्धव गटातील आमदार राजन साळवी यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे कोकणात उद्धव ठाकरे गटात राजकीय पोकळी निर्माण झाली असून वैभव नाईक ही राजकीय पोकळी भरून काढतील असे वाटते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या