8.3 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

ढसाळांच्या कवितेची उंची आणि सेन्सॉर बोर्ड   

ढसाळांच्या कवितेची उंची आणि सेन्सॉर बोर्ड 

 बंडखोर कवी व दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या चळवळीवर प्रकाश टाकणारा चित्रपट ‘चल हल्ला बोल’ लवकरच येत आहे. हा चित्रपट प्रामुख्याने दलित पँथर, युवा क्रांती दल या चळवळीवर आधारित आहे. हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील नामदेव ढसाळांच्या कवितांवर आक्षेप घेतला आहे. तसेच सेन्सॉर बोर्डाने या कविता चित्रपटातून हटवण्यास सांगितले आहे. या कवितांमध्ये शिव्या आहेत, अश्लीलता आहे असे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याने मांडले, यामुळे साहित्य वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. या अधिकाऱ्याला नामदेव ढसाळांबाबत माहिती दिली असता त्याने, “कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही” असे उद्दाम वक्तव्य केले. यामुळे दलित चळवळीतील कार्यकर्ते व महाराष्ट्रातील जनतेने संताप व्यक्त केला आहे.

चित्रपटातील ढसाळांच्या कवितांना सेन्सॉर बोर्डाचा विरोध  

सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील कविता हटवण्यास सांगितल्याने नामदेव ढसाळ यांच्या पत्नी व कवयित्री मलिका अमिर शेख यांनी या सगळ्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. अशा उद्दाम अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी मलिका अमर शेख यांनी केली आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी सरकारला जाब विचारला आहे. अशा व्यक्तीची तुम्ही सेन्सॉर बोर्डावर कशी काय नियुक्ती करता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. नामदेव ढसाळ यांना आत्तापर्यंत मानाचे महाराष्ट्र राज्य पुरस्कार, सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार, महाराष्ट्र राज्य कवी केशवसुत पुरस्कार,पद्मश्री पुरस्कार, साहित्य अकादमी स्वर्णजयंती: जीवनगौरव पुरस्कार मिळाले आहेत. नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आणि शाहीर अमरशेख यांची कन्या मलिका अमर शेख यांनी म्हटले आहे, ज्या माणसाने त्याच्या शब्दप्रभूत्त्वाने संपूर्ण मराठी साहित्याला उज्ज्वल केले, ज्याने आपल्या मातीतच नव्हे तर जागतिक साहित्यात नाव कमावले. आपल्या मराठीचा झेंडा जगभर मिरवला. अशा माणसाचे नाव घेऊन तुम्ही त्यांचा अपमान करता. नामदेव ढसाळ यांचा अपमान करणाऱ्या त्या अधिकार्‍याला तातडीने निलंबित केले पाहिजे. मी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करते. त्या माणसाला त्याच्या पदावरून काढून टाकले पाहिजे, अशी मी मागणी करते. मुळात अशी माणसे तुम्ही इतक्या महत्त्वाच्या पदांवर नेमताच कशी?

जागतिक विद्रोही कवी नामदेव ढसाळ

कवीवर्य नामदेव ढसाळ हे विद्रोही कवी होते. संत तुकाराम यांच्या कवितेशी त्यांची तुलना होऊ शकत नाही, परंतु कवितेत तेवढीच स्पष्टोक्ती होती. ढसाळ यांच्या साहित्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांच्या गोलपिठा या साहित्यकृतीने त्यांचे कवितेतील स्थान अढळ झाले. उपहासात्मक कवितेतून त्यांनी दलित माणसाचे तळागातील जीवन अधोरेखित केले. ढसाळ यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार, पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटिल साहित्य पुरस्कार, गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, बुद्ध रोहिदास विचार गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. नामदेव ढसाळ हे मराठी कवी, विचारवंत, दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि बौद्ध-दलित चळवळीतील नेते होते. महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोली भाषेत लेखन करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे लेखक होते. दलित समाजावर जो अन्याय झाला त्याविरोधात आवाज उठवणारी त्यांची कविता म्हणजे धगधगता ज्वालामुखी होता.

इ.स. १९७३ मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह गोलपिठा प्रकाशित झाला. मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले हा माओवादी विचारांवर आधारित, तर प्रियदर्शिनी हा त्यांचा इंदिरा गांधी यांच्या विषयीचा कविता संग्रह आहे. तसेच खेळ हा शृंगारिक कवितांचा संग्रह आहे. नामदेव ढसाळ यांचे निधन वयाच्या ६५ व्या वर्षी झाले. मुंबईतील ‘गोलपीठा’ या वेश्यावस्ती असलेल्या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील खाटीक होते. नामदेव ढसाळांनी मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. ढसाळांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर मोठा प्रभाव होता. त्यांनी काव्य, गद्य, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मांडले. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली.

ढसाळांची दलितांसाठी आंदोलने

ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना प्रसिद्धी दिली. महाराष्ट्र आणि भारताला प्रभावित करणार्‍या ‘दलित पॅंथर’ या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या संस्थेची स्थापना त्यांनी इ.स. १९७२ मध्ये प्रामुख्याने कवीवर्य राजा ढाले, रामदास आठवले, प्रा. अरुण कांबळे या सहकार्‍यांच्या सहाय्याने केली. या संघटनेवर अमेरिकेतील ब्लॅक पॅंथर चळवळीचा प्रभाव होता. या संघटनेद्वारा ढसाळ यांनी दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली व तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घेण्यास भाग पाडले. मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. दलित चळवळीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

ढसाळांचे साहित्य

नामदेव ढसाळ हे इ.स. १९६० नंतरच्या मराठी कवींमधील प्रमुख कवी समजले जातात. त्यांनी विशिष्ट शैलीने मराठी कवितेत मोलाची भर घातली. त्यांनी भाषिकदृष्टया प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरली. त्यांच्या लिखाणावर लघुनियतकालिकांचा, मनोहर ओक यांचा तर काही प्रमाणात दिलीप चित्र्यांचा प्रभाव दिसतो. त्यांच्या कृतींमध्ये वेदना,विद्रोह आणि नकार हा स्थायीभाव आहे. त्यांनी अनेक दर्जेदार कविता संग्रह लिहिले. आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शनी, खेळ, गोलपिठा, तुझे बोट धरून चाललो आहे मी, तुही इयत्ता कंची, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, या सत्तेत जीव रमत नाही, मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे, गांडू बगीचा, निर्वाणा अगोदरची पीडा, चिंतनपर लेखन, सर्व काही समष्टीसाठी, बुद्ध धर्म: काही शेष प्रश्न, आंबेडकरी चळवळ, आंधळे शतक ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. दलित पॅंथर- एक संघर्ष हे पुस्तक नामदेव ढसाळ यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. निगेटिव्ह स्पेस, हाडकी हाडवळा, उजेडाची काळी दुनिया या कादंबर्‍यांचे लेखनही त्यांनी केले. अंधार यात्रा हे नाटकही त्यांनी लिहिले. नामदेव ढसाळांनी प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान दिले. पिचलेल्या दलित समाजाच्या मनातील जातीभेदाचा, त्यांच्यावरील अत्याचारांचा लाव्हारस त्यांच्या कवितेतून बाहेर पडतो.

समष्टीसाठी लिहिणारा महाकवी

‘हे सारे विश्वव्यापी गळूप्रमाणे फुगू द्यावे. अनामवेळी फुटू द्यावे, रिचू द्यावे. नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये’, ‘काळा गोरा म्हणू नये तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शुद्र असे हिणवू नये’, ‘आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने राहावे’, ‘चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे, एक तीळ सर्वांनी कांडून खावा माणसावरच सुक्त रचावे’, ‘माणसाचेच गाणे गावे माणसाने’ अशा त्यांच्या कवितेतील काव्यपंती ‘सारे काही समष्टीसाठी’या उक्तीची प्रचिती देतात. नामदेव ढसाळांचे काव्य म्हणजे मानवतेचा घेतलेला शोध होय. समष्टी म्हणजे सर्वांसाठी होय.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या