कराड/प्रतिनिधीः-
कराड एसटी स्टँड समोरील असलेली अतिक्रमणे तातडीने काढा, असा आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी 12 जुलैला दिला असताना सुद्धा कराड पालिकेच्या अधिकार्यांनी या आदेशाला हरताळ फ ासत बासनात गुंडाळला ज्या व्यापार्यांनी मागणी केली ते व्यापारीच उघड्यावर पडले अशी परिस्थितीती पालिकेच्या कामकाजातून दिसत आहे. पालकमंत्र्यांना हे अधिकारी दाद देत नसतील तर व्यापार्यांना कशी काय देणार? असा प्रश्नच यांच्या कारभाराविषयी झाला आहे.
12 जुलैला पालकमंत्री शंभूराज देसाई कराड विश्रामगृहात आले असता, या ठिकाणी कराड एसटी स्टँड समोरी भूविकास बँकेजवळ असलेल्या फु टपाथ व समोरील अतिक्रमणे काढावी असे निवेदन येथील दुकानदारांनी पालकमंत्र्यांना दिले. त्यावेळी पालकमंत्र्यांनी कराड पालिकेचे सी.ओ. कुठे आहेत? अशी विचारणा केली मात्र ते सातारा येथे मिटींगला गेले असल्याचे उपस्थितीत असलेल्या पालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी हे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द करत तातडीने येथील अतिक्रमणे काढा असा आदेश दिला. त्यांच्या पवित्र्याने दुकानदार खूष झाले, जणू काय ही अतिक्रमणे निघालीच असे त्यांना वाटले पण तब्बल महिना उलटला तरी या ठिकाणी कारवाई होत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदरची बाब पालकमंत्र्यांच्या पुन्हा निदर्शनास आणून देण्याचा निर्णय घेतला असून भविष्यात आता काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
कराडच्या दत्त चौकापासून ते कृष्णा नाक्यापर्यंत सर्व सामान्यांना चालत जाणे शक्य वाटत नाही. रस्त्याच्या दोन्ही फु टपाथ व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. गाडे आणि इतर खाद्यपदार्थ विकणारे जणू काही या ठिकाणचे मालकच झाले आहेत. ते मनमानीपणे वाहन चालकांना बोलत असतात. ये जा करणार्या महिलांनाही त्याचा त्रास होतो. पण ही अतिक्रमणे तथाकथीत पुढार्यांच्या आशिर्वादाने उभी असल्याने त्यांच्यावर कारवाई करताना पालिकेचा अधिकारी धाडस करत नाही. आणि करावयास गेला तर त्याला त्या भाषेत उत्तर ऐकावे लागते. त्यामुळे अधिकार्यांचीही चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. पुन्हा हा प्रश्न पालकमंत्र्यांच्याकडे गेला तर मात्र संबंधित अधिकार्यांची काही खैर नाही. पालकमंत्र्यांचा आक्रमक स्वभाव यांना महागात पडू शकतो याचे भान ठेवून तरी त्यांच्या आदेशाचे पालन करावे अन्यथा येणार्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे मात्र निश्चित.