सडलेला गहू, आळ्या झालेला तांदूळ रेशनवर ; नागरिकांचा संतप्त
उंब्रज/प्रतिनिधी
कराड तालुक्यातील रेशनिंग दुकानांतून नागरिकांना सडलेला गहू आणि आळ्या झालेला तांदूळ वितरित झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी होत असलेल्या या थेट खेळामुळे सर्वसामान्यांमध्ये संताप उसळला असून, हे धान्य आमदार-खासदारांनी आधी खाऊन दाखवावे असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
सध्या नागरिकांना तीन महिन्यांतून एकदा रेशनिंग मिळते. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील बहुतांश गावांत धान्याचे वाटप झाले. मात्र शिवडे, वहागावसह अनेक गावांमध्ये नागरिकांच्या हातात पोचलेले धान्य पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड झाले आहे. गव्हामध्ये कुज, सड व किडे असल्याचे दिसून आले, तर तांदळात सर्रास आळ्या निघाल्या. हे धान्य खाल्ल्यास गंभीर आजार, अन्नविषबाधा होण्याचा धोका असल्याचे स्पष्ट आहे. तरीसुद्धा पुरवठा विभागाकडून या गंभीर विषयाकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असून जबाबदारी झटकण्याची भूमिका घेतली जात आहे.
शिवडे येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप घाडगे यांनी सोमवारी प्रत्यक्ष कराड येथील पुरवठा विभागाच्या कार्यालयात सडलेला गहू व आळ्यांनी भरलेला तांदूळ दाखवून जाब विचारला. मात्र आम्ही काय करू शकतो असे उत्तर देत पुरवठा अधिकाऱ्यांनी हात झटकले. या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र संताप निर्माण झाला आहे.
दरम्यान वहागावचे सरपंच संग्राम पवार यांनीसुद्धा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याचा आरोप केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, असे धान्य आमच्यावर लादण्यापेक्षा ते आमदार-खासदारांनी आधी खाऊन दाखवावे. अन्यथा नागरिकांचा संताप आवरता येणार नाही.
शिवडे ग्रामस्थ आणि दक्षता समितीने तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन खराब धान्याचे वितरण थांबवण्याची मागणी केली आहे. स्वस्त धान्य दुकानांत आलेला गहू पूर्णपणे सडलेला असून त्यात सोंडकिडे झाले आहेत. असे धान्य आम्ही स्वीकारणार नाही आणि तातडीने यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी संदीप घाडगे यांनी केली आहे.
या प्रकारामुळे कराड तालुक्यातील नागरिक संतप्त झाले आहेत. महागाई आणि बेरोजगारीच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना जगण्यासाठी जेवणाचा आधार मिळावा म्हणून सरकारकडून दिले जाणारे रेशनिंग धान्य जर खाण्यायोग्य नसेल तर ती योजना नसून मृत्यू योजना आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून येत आहेत. नागरिकांचा ठाम इशारा आहे की प्रशासनाने तातडीने योग्य व दर्जेदार धान्य पुरवठा केला नाही तर मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभे केले जाईल.
एकंदरीत, कराड तालुक्यातील रेशनिंगमधील धान्य घोटाळा उघडकीस आला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून प्रशासन व पुरवठा विभाग झोपलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार थेट जिवावरचा प्रश्न ठरत असल्याने तातडीने कारवाई होणे अत्यावश्यक आहे.