सीईओ विशाल नरवाडे यांना प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार प्रदान
शिराळा/प्रतिनिधीः-
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे (भा.प्र.से.) यांना आंध्र प्रदेश येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 28व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेत, प्रतिष्ठित ’राष्ट्रीय सुवर्ण पुरस्काराने’ गौरविण्यात आले. देशभरातील तब्बल तीन लाखांहून अधिक ग्रामपंचायतींमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या हस्ते श्री. नरवाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये रोख, मानाची ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र असे आहे. राष्ट्रीय स्तरावरील या मोठ्या सन्मानामुळे श्री. नरवाडे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
यावर्षी प्रथमच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामपंचायत) ई-गव्हर्नन्स कामगिरीसाठी स्वतंत्र पुरस्कार श्रेणी सुरू करण्यात आली. विशेष अभिमानाची बाब म्हणजे, श्री. नरवाडे यांनी धुळे जिल्ह्याचे सीईओ असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी ग्रामपंचायतीने केलेल्या डिजिटल कार्याला या नव्या श्रेणीतील देशातील पहिलाच सुवर्ण पुरस्कार मिळाला. या ऐतिहासिक कामगिरीमुळेच श्री. नरवाडे यांचे नाव देशपातळीवर कोरले गेले आहे.
डिजिटल क्रांतीचे ’रोहिणी मॉडेल’ श्री. विशाल नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली रोहिणी ग्रामपंचायतीने डिजिटल परिवर्तनाची एक नवी दिशा दाखवली आहे. ऑनलाइन सेवा: गावासाठी स्वतंत्र वेबसाइट तयार करून सर्व सेवा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आल्या. आधुनिक अंगणवाडी: कृत्रिम बुद्धिमत्तेवर (अख) आधारित अद्ययावत अंगणवाडी सुरू केली. डिजिटल तक्रार निवारण: माझी पंचायत प द्वारे नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण. पारदर्शक कारभार: निर्णय प च्या माध्यमातून ग्रामसभेचे निर्णय ऑनलाइन प्रसिद्ध करून कारभारात पारदर्शकता आणली.
या अभिनव उपक्रमांमुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांचे समाधान लक्षणीयरीत्या वाढले.
सांगली जिल्ह्यातही होणार डिजिटल क्रांती आता सांगली जिल्ह्याचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सीईओ विशाल नरवाडे हेच यशस्वी ’डिजिटल गव्हर्नन्स मॉडेल’ सांगली जिल्ह्यातील सर्व 700 ग्रामपंचायतींमध्ये राबवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे लवकरच सांगली जिल्ह्यातही प्रशासकीय कारभारात मोठी डिजिटल क्रांती पहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.