सामाजिक कार्यकर्ते दादासो शिंगण यांची तत्परता; अक्षय आणि दशरथ या तरुणांचेही योगदान
कराड/प्रतिनिधी : –
दोन तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या धाडसाने एका महिलेला आत्महत्येपासून वाचवण्यात यश आले. मलकापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते दादासो शिंगण, तसेच अक्षय आणि दशरथ या दोन तरुणांच्या तत्परतेमुळे ५४ वर्षीय महिलेचा जीव थोडक्यात बचावला.
याबाबतची माहिती अशी की, अक्षय व दशरथ हे दोन तरुण कामावर जात असताना त्यांनी एका महिलेला पुणे-बंगळूरू महामार्गावरील कोयना पुलाच्या कठड्यावर चप्पल काढून उभ्या राहिल्याचे पाहिले. संबंधित महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आल्याने त्यांनी तत्काळ मदतीसाठी ओरड केली. त्याचवेळी त्या मार्गाने जात असलेले सामाजिक कार्यकर्ते दादासो शिंगण यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. दोघा तरुणांनी त्यांना परिस्थिती सांगितली आणि शिंगण यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली.
शिंगण यांनी संबंधित महिलेला थांबवण्याचा प्रयत्न करताच, ती चिडून, मला धरू नका, असे म्हणाली. मात्र, शिंगण यांनी शांतपणे तिला समजावत तुम्ही माझी बहीण आहात, आत्महत्या करून काही सुटणार नाही, असे सांगत संवाद साधला. काहीवेळ त्यांच्या मागे जात राहून, त्यांनी तिला कोल्हापूर नाका ते पंकज हॉटेलमार्गे कराड शहर पोलीस ठाण्यापर्यंत आणले.
दरम्यान, पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली होती. शहर पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर महिला कॉन्स्टेबल आणि अधिकारी यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी तिच्याशी संवाद साधून तिच्या मानसिक स्थितीची जाण घेतली. चर्चेनंतर ती कौटुंबिक कारणांमुळे तणावात असल्याचे लक्षात आले. अखेरीस पोलिसांनी समुपदेशन करून त्या महिलेस तिच्या मुलीच्या ताब्यात सुरक्षित सोपवले.
या प्रसंगात अक्षय, दशरथ या तरुणांसह दादासो शिंगण यांनी दाखवलेली सामाजिक संवेदनशीलता आणि तत्परता खरंच प्रशंसनीय आहे. त्यांच्या वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे एका निरपराध जीवाला जीवदान मिळाले. कराड शहर पोलीस ठाण्याच्या पीएसआय देशपांडे मॅडम यांच्या समुपदेशनामुळेही त्या महिलेला नव्याने जगण्याची प्रेरणा मिळाली.





