कराड/प्रतिनिधी : –
कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि आधुनिक शेती पद्धती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, यासाठी कराड येथे भव्य कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. या प्रदर्शनाला प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 यादरम्यान हे प्रदर्शन होणार आहे. या संदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस आत्मा प्रकल्प संचालक अजय शेंडे, बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे तसेच कृषी विभागातील अधिकारी आणि बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, संशोधन, उत्पादन, ब्रॅण्डिंग आणि विक्री या सर्व टप्प्यांवरील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रदर्शनामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी व्यापक जनजागृती करावी.
तसेच त्यांनी, सेंद्रीय कृषी मालाचे जास्तीत जास्त स्टॉल उभारावेत, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी तंत्रज्ञान माहिती उपलब्ध करावी, अत्याधुनिक शेती अवजारांचे स्टॉल उभारून डेमो द्यावेत, प्रदर्शन परिसरात पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट्स आणि स्वच्छतेची उत्तम व्यवस्था करावी, आदी सूचना दिल्या.
सभापती सतीश इंगवले यांनी सांगितले की, माजी सहकारमंत्री लोकनेते विलासकाका पाटील उंडाळकर यांनी या प्रदर्शनाची संकल्पना राबविली होती. ही परंपरा बाजार समितीच्या माध्यमातून यावर्षीही भव्य स्वरूपात पुढे नेण्यात येणार आहे.





