एसटी बससमोरून वाघिणीची धूम; प्रवाशांसह स्थानिकांचा जीव टांगणीला
कराड/प्रतिनिधी : –
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत मुक्तसंचार करणाऱ्या ‘तारा’ या प्रौढ वाघिणीचे बुधवारी सकाळी थरारक दर्शन झाले. माईंगडेवाडी येथे मुक्कामी असलेली एसटी बस पाटणकडे रवाना होत असताना अचानक झुडपातून वाघीण थेट रस्त्यावर आल्याने काही क्षणांसाठी प्रवाशांचा श्वास रोखला गेला. वाघिणीची झलक पाहताच बसमधील प्रवाशांचे काळजाचे ठोके चुकले, तर परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोलीच्या घनदाट जंगलात उभारण्यात आलेल्या सुरक्षित कुंपणात प्रौढ वाघीण STR-05 उर्फ ‘तारा’ला सोडण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी (दि. १८ डिसेंबर) सकाळी तिने कुंपण ओलांडत यशस्वी मुक्तसंचार केला. काही दिवस सॉफ्ट रिलीज प्रक्रियेत असलेली तारा सुरक्षितपणे कुंपणाबाहेर पडून चांदोलीच्या कोअर जंगलात दाखल झाली होती.
यानंतर नैसर्गिक अधिवास शोधण्याच्या उद्देशाने तिने जंगल क्षेत्रात भटकंती सुरू केल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पाटण खोऱ्यासह लगतच्या ग्रामीण भागात अधूनमधून तिचे दर्शन होत असून, नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे.
बुधवारी सकाळी ढेबेवाडी खोऱ्यातील माईंगडेवाडी परिसरात तिचे पुन्हा दर्शन झाले. रस्त्यावर अचानक वाघीण आल्याने काही काळ वाहतूक थांबली. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र या घटनेची चर्चा तालुक्यासह जिल्हाभरात रंगली आहे.
दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास टाळावा, जंगलालगतच्या भागात अनावश्यक वर्दळ करू नये, असे सूचनाही देण्यात आल्या आहेत.





