राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची घोषणा
कराड/प्रतिनिधी : –
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महापालिकेच्या निवडणूक प्रभारीपदी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची अधिकृत घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या मार्गावर आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राज्यातील एकूण २९ महापालिकांसाठी निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या इचलकरंजी महापालिकेची जबाबदारी बाळासाहेब पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिकेची निवडणूक यशस्वीरीत्या जिंकण्यात आली होती. त्यांच्या संघटन कौशल्याचा आणि निवडणूक व्यवस्थापनातील अनुभवाचा विचार करूनच पक्षाने इचलकरंजी महापालिकेच्या निवडणूक प्रभारीपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असल्याचे बोलले जात आहे.
या निवडीबद्दल पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बाळासाहेब पाटील यांचे अभिनंदन केले आहे. इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत या नियुक्तीमुळे मिळत आहेत.





