निवडणूक कार्यक्रम जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला मतमोजणी व निकाल, राजकीय हालचालींना गती
कराड/प्रतिनिधी : –
राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरु असतानाच आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. त्यामुळे आता या निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याने ग्रामीण भागातील राजकारण तापू लागले आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील २९ महानगरपालिकांसाठीच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असून, आज मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. तर परवा गुरुवारी (दि. १५) प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
या निवडणुकांच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतानाच निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्याने राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी १६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. दाखल झालेल्या अर्जांची गुरुवारी (दि. २२) रोजी छाननी होणार आहे. त्यानंतर उमेदवारांना मंगळवारी (दि. २७) रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुभा देण्यात आली आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३.३० नंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
यानंतर गुरुवारी (दि. ५) फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, शनिवारी (दि. ७) फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा सलग निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे निवडणूकमय झाले आहे. विशेषतः सातारा जिल्ह्यात इच्छुक उमेदवार, पक्षीय नेते व कार्यकर्ते आधीपासूनच तयारीला लागले असून, आगामी काळात ग्रामीण राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





