spot_img
spot_img
spot_img
spot_img

लोकनेता गेला…

 कृष्णाकाठ / अशोक सुतार 

दि. २९ जानेवारी २०२६ 

हाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती पदांपेक्षा मोठ्या ठरतात. त्यांच्या नावाभोवती केवळ सत्तेची नव्हे, तर निर्णयक्षमता, धाडस, स्पष्टवक्तेपणा आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते विणलेले असते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन हे केवळ एका नेत्याचे जाणे नाही; तो महाराष्ट्राच्या सत्तावर्तुळातील एक निर्णायक दुवा तुटण्याचा क्षण आहे. बारामतीपासून मंत्रालयापर्यंत, जिल्हा परिषदांच्या बैठकींपासून थेट सत्तेच्या केंद्रापर्यंत दादा हे नाव वजनदार होते. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ही भावनिक कमी आणि राजकीयदृष्ट्या अधिक गंभीर आहे.

अजितदादा पवार यांची ओळख कायमच स्पष्ट बोलणारा नेता अशी राहिली. जे वाटेल ते बोलणे, कोणाला दुखावेल याचा फारसा विचार न करणे, हा गुण त्यांच्या समर्थकांसाठी प्रामाणिकपणाचे लक्षण होते, तर विरोधकांसाठी अहंकाराचे. पण प्रश्न असा आहे की, आजच्या काळात प्रामाणिक स्पष्टवक्तेपणा ही राजकारणातील गरज आहे की अडचण ? राजकारण अधिकाधिक स्क्रिप्टेड, गोडबोले होत असताना, शब्द मोजून बोलणारे नेते वाढत असताना, अजित पवार यांचा थेटपणा हा अपवाद ठरत होता. त्यांच्या जाण्याने हा अपवादही संपुष्टात येतो का, असा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा स्पष्टवक्ते असलेले नेते राजकारणात नाहीत, असे जाणवते त्यावेळी बोलघेवडे, लाळघोटयांचे प्राबल्य वाढते. म्हणूनच अजितदादांसारखे स्पष्टवक्ते नेते जनतेच्या र्‍हदयस्थानी वसतात. लबाड पुढार्‍यांपेक्षा अजितदादांसारखे नेते खरे असतात, सच्चे असतात.

जनतेशी थेट संवाद करणारा नेता

अजित पवार यांची सर्वात मोठी राजकीय भांडवल म्हणजे त्यांचा थेट जनसंपर्क. फाईलवर सही करणारा मंत्री म्हणून नव्हे, तर रस्त्यावर उभा राहून तक्रार ऐकणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. काम होईल की नाही याची हमी नसली तरी दादा भेटतील आणि अधिकार्‍याला काम करण्याबाबत ताकीद देतील, याची खात्री कार्यकर्त्यांना असायची.आजच्या राजकारणात, जिथे नेते सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधतात, तिथे अजित पवार यांचा प्रत्यक्ष उपस्थितीवर विश्वास होता. त्यामुळेच प्रश्न उभा राहतो, दादांनंतर जनतेपर्यंत पोहोचणारा नेता कोण ?

सत्ता, महत्वाकांक्षा आणि अपूर्ण स्वप्न

सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवणारा नेता मुख्यमंत्री होऊ शकला नाही, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी विसंगती मानली जाते. मात्र अजित पवार यांची खासियत म्हणजे त्यांनी या अपूर्णतेला कधीच सार्वजनिक रडगाणे बनवले नाही. राजकारणात हा संयम राजकारणात दुर्मीळ आहे. सत्तेसाठी बंड करणारे, पक्ष फोडणारे नेते आपण पाहिले; पण अपेक्षा पूर्ण न झाल्यावरही कामात झोकून देणारा नेता ही प्रतिमा अजित पवार यांना वेगळी ठरवते.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि ‘दादांनंतरचा’ प्रश्न

अजित पवार यांचे निधन म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससाठी केवळ भावनिक धक्का नाही, तर संघटनात्मक संकट आहे. पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते हे ‘दादांच्या छत्राखाली’ राजकारण करत होते. आज ती सावली नाही. प्रश्न असा आहे की, पक्षातील निर्णय प्रक्रिया कोणाच्या हातात जाणार ? कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कोण टिकवणार ? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, दादांनी जपलेला ‘ग्राउंड कनेक्ट’ कोण सांभाळणार ? राजकारणात नेतृत्व ही रिकामी खुर्ची नसते; ती जबाबदारी असते. ती जबाबदारी उचलण्यासाठी सक्षम नेतृत्व तयार आहे का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. कदाचित या प्रश्नाचे उत्तर नियतीने दिले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षांचे एकत्र बळाने झाले आहे. त्यातून काहीतरी उपाय निघू शकतो. तरुण रक्ताला सक्रीय, आक्रमक, स्पष्टवक्ता नेता हवा आहे, ती गरज दादानंतर भरून येईल किंवा पूर्ण होईल.

निवडणुका, सत्ता आणि अपघाताची वेळ

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला, ही बाब राजकीयदृष्ट्या अस्वस्थ करणारी आहे. प्रचारासाठी धावणारा नेता, गावागावांत सभा घेणारा उपमुख्यमंत्री, हे चित्र आजच्या राजकारणात दुर्मिळ होते. हा अपघात केवळ दुर्दैवी नाही, तर राजकारणातील अति-धावपळीचा आरसा आहे. सत्ता टिकवण्यासाठी नेत्यांना स्वतःच्या जीवाचीही पर्वा राहत नाही, ही वस्तुस्थिती या घटनेने पुन्हा समोर आणली.

लोकशाहीत नेता अमर असतो का?

नेते येतात आणि जातात, व्यवस्था टिकते, हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे. पण काही नेते असे असतात की, त्यांच्या जाण्याने व्यवस्था डगमगते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे असेच होते. अजित पवार यांचे जाणे हे त्याच श्रेणीत मोडते.आज जनतेसमोर प्रश्न आहे की, आपल्यासाठी ठाम उभा राहणारा नेता गेला, आता आपला आवाज कोण ऐकणार ? निर्णय घेताना जनतेचा विचार कोण करणार ? आणि सत्तेच्या खेळात सामान्य माणूस पुन्हा एकदा दुर्लक्षित तर होणार नाही ना ?

शोकातून आत्मपरीक्षणाकडे

तीन दिवसांचा शासकीय दुखवटा, अर्ध्यावर उतरवलेले राष्ट्रध्वज, भावपूर्ण श्रद्धांजली हे सगळे आवश्यक आहे. पण त्याहून आवश्यक आहे आत्मपरीक्षण. अजित पवार यांचे जीवन आपल्याला एक प्रश्न विचारायला भाग पाडते, राजकारण व्यक्तीकेंद्रित ठेवायचे की मूल्यकेंद्रित ? जर ‘दादा’ हे केवळ व्यक्ती म्हणून आठवले गेले, तर ही हानी भरून न येणारी ठरेल. पण जर त्यांच्या कार्यपद्धतीतून, जनतेशी असलेल्या नात्यातून, निर्णयक्षमतून प्रेरणा घेतली गेली, तर तेच त्यांना खरे आदरांजली ठरेल. शेवटचा प्रश्न… आज महाराष्ट्र एका शोकाकुल वळणावर उभा आहे. नेता गेला आहे. पण प्रश्न जिवंत आहेत. दादांनंतर राजकारण अधिक संवेदनशील होणार का, की अधिक संधीसाधू ? जनतेचा आवाज बळावणार का, की सत्तेचा ? आणि सर्वात महत्वाचे, ‘अजित पवार’ ही केवळ व्यक्ती म्हणून संपली, की एक राजकीय संस्कृतीही संपली ? या प्रश्नांची उत्तरे काळ देईल. पण तोपर्यंत, महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी प्रत्येकाला अस्वस्थ करत राहील.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या