16.1 C
New York
Tuesday, March 11, 2025

Buy now

spot_img
spot_img

दिल्लीत भाजपचा अनपेक्षित विजय

कृष्णाकाठ / दि. ०९ फेब्रुवारी २०२५ /अशोक सुतार 

 

दिल्लीत भाजपचा अनपेक्षित विजय

आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच प्रकारच्या मतदार वर्गासाठी प्रयत्न करत होते. आप आणि काँग्रेस यांच्यातील वादाचा शेवटी भाजपाला फायदा झाल्याचे दिसून आले. मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या उद्दिष्टाने अमित शाह यांनी एका सभेत म्हटले की, २०२० रोजी दिल्लीतील दंगलीला आम आदमी पक्ष जबाबदार होता. त्यांच्यामुळे राजधानीत हिंसाचार उसळला. तसेच अमित शाह यांनी म्हटले की, दिल्लीमध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाल्यास दिल्लीतील सर्व रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना हुसकावून लावले जाईल. भाजपचे शेवटच्या क्षणी धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयोग यशस्वी होऊन व्हाजपला राजकीय फायदा झाला आणि भाजपचे पारडे सत्तेकडे झुकले. आप आणि काँग्रेसच्या भांडणात भाजपचा राजकीय लाभ झाला असेच म्हणता येईल.  
—————————————————————————————
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा नुकताच निकाल लागला आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भारतीय जनता पक्ष ४७ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २२ जागांवर आघाडीवर आहे. दिल्लीच्या निकालाचे चित्र स्पष्ट असून भाजपाकडे दिल्लीची सत्ता गेली आहे. ही निवडणूक आम आदमी पार्टी आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती. भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी पूर्वीपासून केली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपला दिल्ली राज्यात शतप्रतिशत यश मिळाले होते. भाजपचे सातही खासदार निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. खरे तर हाच आप ला धोक्याचा संदेश होता. परंतु यातून काहीच बोध आम आदमी पक्षाने घेतलेला दिसत नाही. दिल्लीत भाजपाचे सरकार स्थापन होणार असल्याने भ्जपा समर्थकांमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे आम आदमी पक्षाला धक्का बसला आहे. एवढेच नाही तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया या दोन मोठ्या नेत्यांचाही पराभव झाला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघामधून भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी पराभव केला आहे. खरे तर अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया हे आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते मानले जातात. मात्र, त्यांचाच निवडणुकीत पराभव झाल्यामुळे हा आपच्या कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का मनला जात आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्यानंतर आणि आम आदमी पक्षाला आलेल्या अपयशानंतर केजरीवाल यांनी, दिल्लीच्या जनतेने दिलेला कौल मान्य असून विजयासाठी भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आम्ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू, असे म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, लोकांनी भाजपला ज्या आश्वासनांसाठी मतदान केले आहे ते सर्व आश्वासने भाजपा पूर्ण करतील. आम्ही आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा या क्षेत्रात खूप काम केलं. आता आम्ही फक्त विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही, तर आम्ही लोकांमध्ये राहून लोकांची सेवा करत राहू. लोकांच्या सुखात आणि दु:खात आम्ही त्यांच्या बरोबर राहू. कारण आम्ही राजकारणात फक्त सत्तेसाठी आलेलो नाहीत, अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते. दिल्लीतल्या ७० जागांसाठी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. एकीकडे अरविंद केजरीवाल यांची अटक, सुटका आणि त्यानंतरच्या घडामोडींनंतर आम आदमी पक्षाने सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले असताना दुसरीकडे इंडिया आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून प्रचारासाठी दिल्ली पुन्हा काबीज करण्यासाठी दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. या दोन्ही पक्षांसमोर यंदा कडवे आव्हान होते ते भारतीय जनता पक्षाचे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे भाजपला दिल्ली विधानसभेत २७ वर्षानी यश मिळाले आहे.

दिल्लीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने दिल्ली सचिवालयाला आदेश जारी केले आहेत की, प्रशासनाशी संबंधित कोणत्याही फाईल किंवा कागदपत्र दिल्ली सचिवालयाच्या बाहेर जाऊ नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हाताळे आहे की, दिल्लीचा चौफेर विकास आणि इथल्या लोकांचे जीवनमान सुधारण्यात आम्ही कोणतीच कसर सोडणार नाही ही आमची गॅरंटी आहे. यासोबतच आम्ही हेही निश्चित करू की विकसित भारताच्या निर्मितीमध्ये दिल्लीची महत्त्वाची भूमिका असेल. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे की, दिल्लीच्या जनतेने हे दाखवून दिले आहे की, जनतेला वारंवार खोट्या आश्वासनांनी फसवले जाऊ शकत नाही. जनतेने आपल्या मतांनी दूषित यमुना, पिण्याचे प्रदूषित पाणी, खराब रस्ते, सांडपाण्याची अव्यवस्था आणि प्रत्येक गल्लीत उघडलेली दारूची दुकाने याला उत्तर दिले आहे.

दिलीतील आम आदमी पक्षाच्या पराभवाची अनेक कारणे असू शकतात. एकतर अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंदर जैन या नेत्यांवर आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कारवाई झाली होती. यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली. कारण केजरीवाल, सिसोदिया यांची स्वच्छ नेते म्हणून प्रतिमा होती. या दिग्गज नेत्यांना ऑगस्ट व ऑक्टोबरमध्ये तुरुंगातून सोडल्यामुळे त्याचाही त्यांच्या निवडणूक मोहिमेवर परिणाम झाला. जनतेमध्ये सदर नेत्यांबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली. दिल्ली महानगर पालिकेतील आम आदमी पक्षाच्या कामगिरीचा मतांवर परिणाम झाल्याचं म्हटले जात आहे. कारण दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजपने महानगरपालिकेच्या कामांवर काही आरोप केले होते. तसेच कचरा, झोपडपट्टी, अस्वच्छता, पालिकेतील गैरकारभार या मुद्द्यांवर भाजपने प्रचार केला होता. भाजपचा हा प्रचार यशस्वी झाल्याचे दिसून आले.

उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणार्या भाजपासारख्या बलाढ्य पक्षाविरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एकजुटीने लढा देण्याची गरज होती. परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी म्हणजे कोंग्रेस आणि आम आदमी पक्षाने आपापले इगो बाजूला सारले नाहीत, परिणामी अशक्य असणारा विजय भाजपाने खेचून आणला आहे. ही बाब पारंपरिक पद्धतीने लढणार्या सर्व नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे असे वाटते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपटी खाल्ली आहे. त्यामुळे भाजपाच्या विजयापेक्षाही काँग्रेसच्या पराभवाची जास्त चर्चा होत आहे. काँग्रेसला त्याचा राष्ट्रीय पक्षाचा बाणा आडवा आला, तर तीन वेळा सत्ता मिळाल्याने आम आदमी पक्षाचे नेते हवेत होते. आम आदमी पक्ष हरण्याची अनेक करणे आहेत. इंडिया आघाडीत एकत्र असूनही काँग्रेसने आप विरोधात आक्रमक प्रचार केला होता. हा प्रचार आप ला भारी पडला. काँग्रेस निवडून आली नाही तरी आप ला निवडणुकीत पाडण्याची अप्रत्यक्ष कामगिरी काँग्रेसने करून दाखवली. आप आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलणी फिसकटली नसती आणि दोघांनी एकत्र निवडणूक लढवली असती तर दोन्ही शक्ति विभागून नुकसान झाले नसते. आप ने जेव्हा दिल्ली निवडणुकीत काँग्रेसकडे पाठिंबा मागितला होता, त्यावेळी काँग्रेसने मन मोठे करत तो दिला असता तर आज निकाल वेगळाच लागला असता. काँग्रेस नेत्यांनी आप हाच दिल्लीतील प्रमुख विरोधी पक्ष मानला आणि आप चे नेते काँग्रेसकडून लक्ष्य झाले. त्यामुळे नुकसान आप चे झाले आहे. आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच प्रकारच्या मतदार वर्गासाठी प्रयत्न करत होते. आप आणि काँग्रेस यांच्यातील वादाचा शेवटी भाजपाला फायदा झाल्याचे दिसून आले. मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या उद्दिष्टाने अमित शाह यांनी एका सभेत म्हटले की, २०२० रोजी दिल्लीतील दंगलीला आम आदमी पक्ष जबाबदार होता. त्यांच्यामुळे राजधानीत हिंसाचार उसळला. तसेच अमित शाह यांनी म्हटले की, दिल्लीमध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाल्यास दिल्लीतील सर्व रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना हुसकावून लावले जाईल. भाजपचे शेवटच्या क्षणी धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयोग यशस्वी होऊन व्हाजपला राजकीय फायदा झाला आणि भाजपचे पारडे सत्तेकडे झुकले. आप आणि काँग्रेसच्या भांडणात भाजपचा राजकीय लाभ झाला असेच म्हणता येईल
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या