2.2 C
New York
Friday, February 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संशयाच्या भोवर्‍यात

कृष्णाकाठ / 05फेब्रुवारी 2025/अशोक सुतार  

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संशयाच्या भोवर्‍यात

अहिल्यानगर येथे ६७ व्या महाराष्ट्र केसरीपदासाठी कुस्ती स्पर्धा झाली. ही स्पर्धा वादग्रस्त ठरली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने पैलवान शिवाजी राक्षे याला ढाक डाव टाकून चिटपट केल्याचे म्हणणे आहे. आणि शिवाजी राक्षे याने आक्षेप घेतला की, माझे दोन्ही खांदे जमिनीला टेकले नसल्याने मी कुस्ती हरलो नाही. यानंतर सर पंच आणि शिवराज राक्षे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे प्रत्यंतर शिवराजने पंचाला लाथ घालण्यात झाले. यापूर्वी अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळविरुद्ध लढताना महेंद्र गायकवाड या पैलवानाने गुणांवरुन वाद झाल्याने पंचांना शिवीगाळ करत वॉकआऊट केले. कुस्तीगीर संघाने, या दोन पैलवानांनी मागणी केल्याप्रमाणे झालेल्या कुस्त्यांचा रिव्हयू दाखवला नाही. त्यामुळे कुस्ती शौकीन आणि कुस्तीगीर नाराज झाले आहेत.

महाराष्ट्रात कुस्तीची परंपरा खूप वर्षांपासून सुरू आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या काळात करवीरनगरीत देशोदेशींचे मल्ल कुस्ती स्पर्धेसाठी येत असत. गावोगावच्या जत्रांमध्ये कुस्त्यांचे फड भरतात. त्यासाठी पैलवान वर्षभर भरपूर मेहनत घेतात. ग्रामीण भागातील लोक आपल्या मुलांना पैलवान बनविण्यासाठी हालअपेष्टा सोसून दूर शहराच्या ठिकाणी नामांकित तालमीत ठेवतात. पैलवानांचे खाणे- पिणे यांकडे बारकाईने लक्ष देतात. पूर्वी प्रत्येक घरी एक मल्ल असायचाच, परंतु काळ बदलला आणि पैलवान दुर्मिळ झाले. कुस्ती परंपरेला घरघर लागली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी तयारी करायची म्हणजे तरुणांना २४ तासातील १८ तास मेहनत, व्यायाम करावा लागतो. त्यासोबत सकस आहाराचा खर्च आहेच. पैलवान बनण्यासाठी अनेक तरुण आपले तारुण्य खर्ची घालतात. ऐन महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचणीत पैलवानाच्या कुस्तीला पंचांनी न्याय दिला नाहीतर पैलवानाची भावना संतप्त होणार हे नक्की ! दोन पैलवानांनी पंचाच्या निर्णयाला विरोध केला आणि झालेल्या कुस्तीचा रिव्हयू दाखवण्याची आणि त्यानंतर काय तो निर्णय घेण्याची मागणी केली होती. परंतु हे करताना सदर पैलवानांचा संयम सुटला आणि पंचांनी त्यांना तीन वर्षांची बंदी घातली.

अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन नेटके केले होते. सर्व कुस्त्या विनावाद पार पडल्यावर अंतिम कुस्त्या चर्चेत आल्या. अंतिम कुस्तीत झालेल्या संशय कल्लोळाने कुस्ती शौकिनांची निराशा झाली आहे. किमान पंचांनी झालेल्या कुस्त्यांचा रिव्हयू दाखवला असता तरी हा संभ्रम मिटला असता किंवा त्यावर योग्य तो अंतिम निर्णय घेतला गेला असता. शेवटच्या दोन कुस्त्यांत राडा झाल्यावर अर्जुन पुरस्कारप्राप्त कुस्तीपट्टू आणि प्रशिक्षक काका पवार यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, महाराष्ट्र केसरी कोणाला करायचे हे स्पर्धेपूर्वीच ठरलेले असते. काका पवार म्हणतात, मी पंच किंवा पैलवानांचे समर्थन करत नाही, कुस्तीपट्टूंचा संयम सुटला म्हणून त्यांचे ३ वर्षांचे निलंबन करणे योग्य वाटत नाही, चुकलेल्या पंचांना जन्मठेप देणार का, असा सवालही पवारांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील राडयानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, कुस्तीचा निकाल देताना पाठ टेकली आहे की नाही हे पाहण्यासाठी पंच पाठीखालुन हात फिरवतात, मगच निर्णय देतात. परंतु असे काही न करता निर्णय देणे हा अन्याय आहे. चंद्रहार पाटलांनी त्यांच्या कारकीर्दीतील २००९ सालचा अनुभव कथन केला आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरीसाठी स्पर्धा खेळताना पंचांनी माझ्यावर अन्याय केला होता, सहा मिनिटांची चालणारी कुस्ती तब्बल दीड तास चालवली होती. त्यावेळी माझ्या मनात आत्महत्येचे विचार सुरू होते, असे चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे. याचवेळी त्यांनी म्हटले आहे की, शिवराज राक्षेवर अन्याय झाला आहे. शिवराजने पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या. चंद्रहार पाटलांच्या या वक्तव्याने खळबळ माजली असली तरी त्यांनी पंचांविरोधात राग व्यक्त केला आहे.

पंचाने शिवराज राक्षे याच्याविरोधात निकाल दिल्याने पंच आणि शिवराजमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि शिवराजने पंच दत्ता माने यांची कॉलर पकडून त्यांना लाथ मारली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काहीही असले तरी पंचांना मारले याचे समर्थन करता येत नाही. पंचाला मारले म्हणूनच शिवराज राक्षे याला कुस्तीगीर संघाने ३ वर्षे निलंबित केले आहे. महेंद्र गायकवाड या मल्लाने पंचाशी हुज्जत घातल्याने त्यालाही ३ वर्षे निलंबित केले. परंतु एवढे होऊनही सामन्याचा रिव्हयू पंचांनी दाखवला नाहे, हे विशेष. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संदीप भोंडवे यांनी म्हटले आहे की, शिवराजने सामन्याचा रिव्हयू मागितला होता. परंतु तीनही पंचांचा निर्णय एकाच असेल तर जागतिक कुस्ती संघाच्या नियम ३१ नुसार, रिव्हयू दाखवणे बंधनकारक नाही. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झालेल्या राड्यामुळे अनेक गोष्टी आता उजेडात आल्या आहेत. त्यावर राज्य कुस्तीगीर संघाने योग्य कार्यवाही करावी आणि या स्पर्धा निकोप, पारदर्शक वातावरणात व्हाव्यात, यासाठी भविष्यात सजग व्हावे ही अपेक्षा आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या