कृष्णाकाठ / 04 feb 2025/ अशोक सुतार
लग्नाचा बहाणा, गंडवण्याचा अनोखा फंडा
सध्या ग्रामीण भागामध्ये युवकांची लग्ने जमवणे ही क्लिष्ट बाब झाली आहे. असे म्हणतात की, गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण इथे कृत्रिमरीत्या पैसा घेऊन लग्न लावणार्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. खोटी नवरी, खोटे वर्हाडी अशा लग्नाळू तरुणांना लुटण्यासाठी टोळ्या सर्वत्र कार्यरत आहेत. या टोळ्यांचे उत्पन्नही लाखोंच्या घरात असते. परंतु अशा टोळ्या पोलिसांकडून नेहमीच दुर्लक्षित राहतात आणि त्यांच्याबद्दल तक्रार देण्यासाठी कोणीही समोर येत नाही. लाखो रुपयांची फसवणूक झाली की, लोक जागे होतात आणि पोलिसांकडे जातात. अशीच एक घटना फलटणमध्ये काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेत इच्छुक वराची किमान 3 लाखाची फसवणूक झाली आहे. लग्न जमवून 3 लाखांची फसवणूक करणार्या पाच जणांच्या टोळीला फलटण पोलिसांनी जेरबंद केले आहे.
फलटण तालुक्यातील कुरवली परिसरातील ४४ वर्षीय शेतकरी युवकाचे लग्न जमत नव्हते. त्यामुळे त्याच्या मित्राने त्याला एका बाईचा मोबाइल नंबर दिला आणि ती लग्न जुळवत असल्याचे सांगितले. त्यानुसार छाया साठे यांच्याशी त्या शेतकरी युवकाने संपर्क साधला आणि आपले लग्न जुळत नसून ते जुळवून देण्याची मागणी केली. छाया साठे हिनेही एक मुलगी लग्नाची आहे, त्यामुळे तुझे काम लवकर होईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर छाया साठे हिने तिची साथीदार जयश्री शिंदे हिच्याशी संगनमत करून दोन मुले असलेल्या दीपाली जाणे या महिलेशी विवाहाचे पक्के केले. छाया साठे आणि जयश्री शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे त्या शेतकरी युवकाचे लग्न दीपालीशी लावूनही दिले. या मोबदल्यात छाया साठे आणि जयश्रीने शेतकरी युवकाकडून २ लाख ७५ हजार रुपये वसूल केले. लग्न जमत नाही म्हणून लग्नासाठी किती ही तडजोड ? असा प्रश्न मनात येतो.
लग्न झाल्यावर संसार सुखाचा होईल, अशी अपेक्षा अनेकांची असते. परंतु लग्न झाल्यावर सहा दिवसांतच तिने शेतकरी युवकाला म्हणजे आपल्या नव्या नवर्याला सांगितले की, पहिल्या लग्नाची दोन मुले असल्यामुळे जावे लागत आहे. नववधू दीपाली जाणे ही पळून गेली. शेतकरी युवकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने विवाह जुळवणार्या छाया साठे आणि जयश्री शिंदेला संपर्क साधला आणि घडलेली हकीकत सांगितली. शेतकरी युवकाने लग्न जुळवण्यासाठी घेतलेले पावणेतीन लाख रुपये परत करण्यास सांगितल्यावर, छाया साठे आणि जयश्रीने तुला दुसरी मुलगी दाखवते असे आश्वासन दिले. परंतु आणखी दीड लाख रुपये खर्च येईल, असेही सांगितले.
त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर जयश्री शिंदे ही शशिकला जाधव (वाशिम जिल्हा ) या नवरी मुलगीला फलटण एस. टी. स्टँडवर घेऊन आली. या नवरी मुलीसोबत तिचे कथित नातेवाईकही (ते सोलापूर जिल्ह्यातील ) होते. काहीतरी खोटा प्रकार सुरू असल्याचे लक्षात आल्यावर शेतकरी युवकाने पोलिसांकडे धाव घेतली आणि पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली. या टोळीकडून कुणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. लग्नाळू तरुण हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढून फसवणूक करणार्या अनेक टोळ्या समाजात कार्यरत आहेत. परंतु समाजातील एक जबाबदार घटक म्हणून सर्वांनी या फसवणुकीविरोधात पाऊल उचलले पाहिजे, असे वाटते. कासेगाव, इस्लामपूर परिसरात काही वर्षांपूर्वी अशाचप्रकारे अनेकांना गंडावले गेले होते. लग्न म्हणजे हिंदू धर्मात पवित्र विधी मानला गेला आहे. परंतु या पवित्र विधीविषयी किळस वाटावी, अशा घटना समाजात घडत आहेत. त्यामुळे लग्नाळू युवकांनी वेगळा विचार करू नये असे वाटते. तुम्ही खंबीर असाल तर लग्न निश्चित जुळून येईल. परंतु दलालांच्या नादी लागणे नको.
लग्न विधी करून देण्याच्या बहाण्याने झालेली फसवणूक निषेधार्ह आहेच, परंतु अशा घटनांना अर्धवट विचारांचे काही तरुण जबाबदार असतात. युवकांनी स्वत:वर विश्वास ठेवावा, स्वत;च्या कर्तबगारीवर विश्वास ठेवावा. नवीन संसार सुरू करण्यापूर्वी संसाराची जबाबदारी नेमकी काय असते ? फक्त लग्न झाले म्हणजे सर्व काही झाले असे नव्हे. त्यासाठी कुटुंबाची जबाबदारी पेलण्याची गरज आहे. त्यासाठी कष्ट, मेहनत करण्याची तयारी हवी. समाजात कमी कष्ट करून जास्त पैसा मिळवण्याची चंगळवादी वृत्ती बोकाळते आहे. त्यामुळे नवरा मुलगा आणि नवरी मुलगीने स्वत:च्या हिंमतीवर घर उभारले पाहिजे असे वाटते. तसेच समाजातील होणारी फसवणूक लवकर लक्षात येणे गरजेचे आहे. अन्यथा, असे फसवणुकीचे प्रकार घडत राहणार आणि आपण चुकलो म्हणून निराश होणार, याला काही अर्थ नाही.