spot_img
spot_img
spot_img
spot_img

कराडमध्ये उड्डाणपुल उद्घाटनाच्या मुहूर्तचा पाठलाग!

कामे अपूर्ण असतानाही घाईगडबड;सुरक्षेच्या उपाययोजना रखडल्या,वाहनधारकांकडून नाराजी

कराड/प्रतिनिधी:-
कराड येथील बहुप्रतिक्षित पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सहा पदरी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. परंतु, पुलावरील सुरक्षाविषयक आणि तांत्रिक कामे अद्याप अपूर्ण आहेत. सातारा-कोल्हापूर दिशेची एक लेन सुरू करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असताना, सुरक्षिततेच्या निकषांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना वाहनधारक व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर उड्डाणपूल 20 जूनला वाहतुकीसाठी खुला होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत, परंतु, याबाबत कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुलावरील प्रत्यक्ष स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुलाच्या अनेक भागांमध्ये दुभाजकांची कामे अपूर्ण आहेत, स्ट्रीट लाईटची व्यवस्था पूर्ण झालेली नाही, संरक्षक कठड्यांवर आवश्यक रंगकाम आणि परावर्तक चिन्हांची उभारणी झालेली नाही. त्यामुळे अशा स्थितीत वाहतूक सुरू करणे धोकादायक ठरू शकते, अशी प्रतिक्रिया वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.
सध्या कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक नांदलापूर परिसरातून उड्डाणपुलावर आणून सातारा-कोल्हापूर लेनवरून मार्गस्थ करण्याचा विचार सुरू आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षात्मक उपाययोजना अद्याप पूर्णत्वास गेलेल्या नाहीत. त्यामुळे वाहतूक सुरू झाल्यानंतर अपघात अथवा अन्य अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाहनधारकांचे म्हणणे आहे की, उड्डाणपूलाची रचना अत्यंत दर्जेदार असून, भविष्यात वाहतुकीसाठी तो मोठा दिलासा ठरणार आहे. मात्र केवळ वेळापत्रक पूर्ण करण्यासाठी किंवा घाईगडबडीत वाहतूक सुरू करण्याऐवजी सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच तो नागरिकांच्या सेवेत द्यावा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
सध्या काही भागात रस्त्यावरील पांढरे पट्टे आणि लाल-पांढरे रिफ्लेक्टर बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र कृष्णा हॉस्पिटलनंतरच्या भागात स्ट्रीट लाईट, चेतावणी व्यवस्था आणि अन्य सुरक्षात्मक उपाययोजना अद्याप दिसून येत नाहीत. त्यामुळे केवळ रिफ्लेक्टर बसवून सुरक्षिततेची पूर्तता होणार नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
हॉटेल ग्रीन पार्क ते कृष्णा हॉस्पिटल या टप्प्यापर्यंत स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आली असली, तरी त्यापुढे कोयना पुलापर्यंतचा मोठा भाग अद्याप अंधारात आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावर वाहतूक सुरू झाल्यास वाहनचालकांसाठी गंभीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नांदलापूरपासून पुढे अनेक ठिकाणी दुभाजकांचे काम पूर्ण झालेले नाही. काही भागांत दुभाजक उभारण्यात आलेलेच नसल्याचे दिसून येते. मुख्य पुलावरील अनेक संरक्षक भिंती व कठडेही अपूर्ण अवस्थेत आहेत. वेगवान वाहतुकीच्या दृष्टीने ही परिस्थिती धोक्याची घंटा मानली जात आहे.
कोल्हापूर-सातारा मार्गिकेवरील एक्सपान्शन जॉइंटचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. संबंधित काम सुमारे 75 टक्क्यांपर्यंत झाल्याची माहिती मिळते. अशा स्थितीत समांतर लेनवर वाहतूक सुरू झाल्यास काम आणि वाहतूक यांचा मेळ साधणे कठीण होऊ शकते. काही भागांतील संरक्षक कठड्यांची कामेही बाकी असल्याचे निदर्शनास येत आहे.
उड्डाणपुलाच्या शेवटच्या टप्प्यात, हॉटेल अमित परिसरात जुन्या कोयना पुलाशी जोडणी करण्यासाठी आवश्यक भरावाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. दोन्ही बाजूंनी नव्याने उभारलेले कोयना पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतरच ही जोडणी शक्य होणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या टप्प्यातील कामे अद्याप सुरुवातीच्या अवस्थेत असल्याचे दिसून येते.
उड्डाणपूल हा कराडच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा असला, तरी तो पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच वाहतुकीसाठी खुला करावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. उद्घाटनाची घाई नको, सुरक्षिततेची खात्री हवी, अशी भावना वाहनधारकांकडून व्यक्त केली जात असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
नांदलापूर ते कोयना पूल या सुमारे पाच किलोमीटरच्या पट्ट्यात वेगमर्यादा, वळण, चढ-उतार, धोक्याची सूचना अथवा दिशा दर्शवणारे फलक मोठ्या प्रमाणात अनुपस्थित आहेत. नवीन मार्गावर प्रथमच प्रवास करणार्‍या वाहनचालकांसाठी ही बाब अडचणीची ठरू शकते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या