देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाची झडप, गाडीच विहिरीत कोसळली; ९ जणांचा मृत्यू
सोलापूर –
देवदर्शन घेऊन माघारी परतणाऱ्या भाविकांवर काळाने वाटेतच झडप घातली. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात ही घटना घडली आहे. पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळली. या भयंकर अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जखमी असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून, बचाव कार्य वेगाने सुरू आहे.
नुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी
गावातील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर सगळे पीकअप वाहनाने परत निघाले. म्हसवड-तांदुळवाडी रस्त्यावरून माघारी येत असताना गाडी अनियंत्रित झाली आणि थेट विहिरीत कोसळली.
म्हसवडवरून निघाल्यानंतर भाविकांचे वाहन माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावाजवळ आले होते. त्याचवेळी हा अपघात घडला. यात ९ भाविकांचा मृत्यू झाला आहे. विहिरीत भरपूर पाणी असल्याने अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याचे समजते. काही जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
रस्त्याच्या कडेलाच विहीर, पाण्यात बुडून मृत्यू
माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी घटनेबद्दल सांगितले की, ‘या घटनेबद्दल मला माहिती मिळाली आहे. अपघातातील मृतांमध्ये चार महिला आणि चार लहान मुलांचाही समावेश आहे. दोन जणांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.’
‘विहीर रस्त्याच्या कडेलाच आहे. नेमका अपघात कशामुळे झाला, याबद्दल मी माहिती घेऊन कळतो. तिथे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. सर्व आपात्कालीन सेवा तिथे दाखल झालेल्या आहेत. विहिरीत पाणी असल्यामुळे बुडून मृत्यू झाले आहेत’, अशी माहिती आमदार उत्तम जानकर यांनी दिली.
आमदार रोहित पवार यांनीही घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ‘म्हसवड-पंढरपूर मार्गावर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) पिकअप गाडी विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत वेदनादायी, दुदैवी आणि मन सुन्न करणारं आहे. यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना! मृतांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या अपघातामागील कारणाचा शोध घेण्यासोबतच शासकीय यंत्रणेने तातडीने बचाव कार्यात मदत करावी, ही विनंती!’, अशा भावना रोहित पवारांनी व्यक्त केल्या आहेत.





