spot_img
spot_img
spot_img
spot_img

सहकारच्या विजयासाठी रयत संघटनेचे भक्कम पाठबळ

उदयसिंह पाटील-उंडाळकर

कराड/प्रतिनिधी : –

सहकार चळवळ सक्षम करण्याचा संकल्प करत, आम्ही पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलो आहोत. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या विजयासाठी रयत संघटना भक्कम पाठबळ देईल, अशी ग्वाही संघटनेचे नेते पाटील-उंडाळकर यांनी दिली.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्वे (ता. कराड) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचारार्थ आयोजित रयत संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सहकार पॅनलचे उमेदवार बी. एन. थोरात, रयत संघटनेचे प्रा. धनाजी काटकर, डॉ. सुधीर जगताप, सुजीत थोरात, रंगराव थोरात, प्रतापराव कणसे, प्रदीप पाटील, शिवाजीराव जाधव, अधिकराव गरुड, के. टी. पाटील, मोहनराव थोरात, माणिकराव पाटील, पैलवान आनंदराव मोहिते, राजू मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
ड. पाटील म्हणाले, ‘रयत’ आणि ‘कृष्णा’ने जवळपास 35 वर्षे एकत्र काम केले आहे. सहकारी संस्था सक्षम करण्यासाठी काका आणि आप्पांनी जो मार्ग आखून दिला, त्यावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रत्येकवेळी विरोधासाठी विरोध करणे समाजाच्या हिताचे नसते. सहकार अबाधित राहिला तर शेतकर्‍याला प्रतिष्ठा मिळणार आहे, कारण सहकारी संस्था या प्रत्येक व्यक्तीच्या प्रपंचाशी निगडित संस्था आहेत. आज कार्पोरेट क्षेत्राशी स्पर्धा करताना आपल्याला सहकारी चळवळ टिकविण्यासाठी प्रत्येक घटकाला घेऊन काम करावे लागणार आहे. त्यामुळे रयत संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत जागरूकतेने काम करुन, सहकार पॅनलला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, आप्पा आणि काकांनी सहकाराचा विचार अंगीकारत एकत्र काम केले, त्यामुळेच या भागात मोठे पथदर्शी काम झाले. त्यातून आपल्या भागाची प्रगती झाली. आता तीच जबाबदारी आम्ही घेतली आहे. सहकारात चांगल्या चालणार्‍या संस्था टिकविण्यासाठी संघर्ष थांबवून एकत्र यायला हवे. भविष्यात आमचेही तुम्हाला भक्कम सहकार्य होईल, याची मी खात्री देतो.
आम्ही जे बोलतो ते करतो. दिलेला शब्द पाळतो. पण आपल्यासमोर उभे असलेले विरोधक मात्र घोटाळेबाज आहेत. महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखानदारीतील सर्वांत मोठा घोटात त्यांनी केला आहे. त्याबद्दल त्यांना जेलची हवा खावी लागली असून, सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. ज्यांच्यामुळे कारखान्याची बदनामी झाली, अशी घोटाळे करणारी लोकं निवडणुकीत पुन्हा मते मागत फिरत आहेत. त्यामुळे सभासदांनी अशा लोकांपासून सावध राहावे आणि त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सहकार पॅनेलला विजयी करावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
प्रा. धनाजी काटकर यांनी सहकार पॅनल 15 हजारांपेक्षा मताधिक्याने निवडून येणार असल्याचे सांगत, सहकार पॅनलच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन एकदिलाने काम करावे, असे आवाहन केले.
डॉ. सुधीर जगताप म्हणाले, कृष्णा आणि कोयना ब्रँड एकत्र आले आहेत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. ज्यावेळी संकट येते तेव्हा कृष्णा कारखाना डॉ. सुरेशबाबांच्या हातात सुरक्षित राहिला आहे. त्यांनी कामगारांना योग्य न्याय देण्याचे धोरण जपले आहे. त्यामुळे कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे.
यावेळी सुजीत थोरात, रंगराव थोरात व प्रतापराव कणसे यांनीही मनोगत व्यक्त केले. अशोकराव थोरात यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला रयत संघटनेच्या विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या