spot_img
spot_img
spot_img
spot_img

पैशाच्या वादातून पेरले येथे गोळीबार

दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

 

उंब्रज , दि. 18 (प्रतिनिधी):

कराड तालुक्यातील पेरले गावच्या हद्दीत इंदोली पुलाजवळ शुक्रवारी मध्यरात्री पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे हिंसक रूप धारण करत एका तरुणावर पिस्तुलातून दोन राऊंड गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात संतोष शंकर घोलप (वय 37) हे दोन्ही पायांना गोळ्या लागून गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात सोमनाथ रमेश चव्हाण (रा. कालगाव) आणि योगेश सुदाम दीक्षित (रा. मसूर) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, शिवीगाळ, धमकी, शस्त्र कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष घोलप यांना सोमनाथ चव्हाण याने पैशाचा व्यवहार मिटविण्याच्या बहाण्याने पेरले येथील इंदोली पुलाजवळील पाणंद रस्त्यावर बोलावले. तेथे आरोपींनी प्रथम शिवीगाळ करून धमकावले. त्यानंतर सोमनाथ चव्हाण याने त्याच्या एमएच-50-0222 क्रमांकाच्या फॉर्च्युनर कारमधून पिस्तुल काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने दोन राऊंड गोळीबार केला. गोळ्या चुकविण्याचा प्रयत्न करत असताना संतोष घोलप यांच्या उजव्या व डाव्या पायाला गोळ्या लागल्या आणि ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर जखमी घोलप यांना तातडीने उपचारासाठी कराड येथील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा जबाब नोंदवून त्यावरून उंब्रज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी सातारा यांनी ९ ते २२ जुलै या कालावधीत सातारा जिल्ह्यात शस्त्रबंदी आदेश लागू केलेला असतानाही आरोपींनी पिस्तुलाचा वापर केल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांखालीही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करीत असून, घटनेमागील पैशाच्या व्यवहाराचे नेमके कारण, वापरलेले पिस्तुल आणि आरोपींच्या हालचालींचा सखोल तपास सुरू आहे. या गोळीबारामुळे कराड तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या