व्हॉट्सॲपवरून कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवले; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल
सातारा/प्रतिनिधी
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी ७१ लाख तीन हजार १८४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनन्या कुलकर्णी आणि गुलटेक चंदानी यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बाळ गंगाधर गाढवे (वय ७०, रा. ग्रीन सिटी अपार्टमेंट, स्कूलजवळ, करंजे, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला.
आरोपी अनन्या कुलकर्णी हिने व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून डेल्टा टेक इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची प्रतिनिधी असल्याचे भासवले. डेल्टा व्हर्सच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून फिर्यादींना गुंतवणुकीस प्रवृत्त केले. सुरुवातीला नफा होत असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी विविध खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगितले.
या आमिषाला बळी पडून फिर्यादींनी एकूण एक कोटी ७१ लाख तीन हजार १८४ रुपये गुंतवले. मात्र, अपेक्षित परतावा मिळत नसल्याने त्यांनी गुंतवलेल्या रकमेची मागणी केली. त्यावेळी पैसे देण्यास नकार मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डी. पी. देशमुख करीत आहेत.





