५ एप्रिलला मतदान; तर ६ रोजी निकाल, निवडणूक बिनविरोध, दुरंगी की तिरंगी याकडे सभासदांचे लक्ष
कराड/प्रतिनिधी : –
संपूर्ण महाराष्ट्रात ऊसाला उच्चांकी दर देणारा साखर कारखाना म्हणून ओळख असलेल्या सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 21 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया शनिवार (दि. ५) एप्रिल रोजी पार पडणार असून रविवार (दि. ६) एप्रिलला मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य सहकारी साखर कारखाना म्हणून सह्याद्रि सहकारी साखर कारखाना ओळखला जातो. तसेच ऊसाला उच्चांकी दर देणारा सहकारी साखर कारखाना म्हणूनही या कारखान्याची ख्याती आहे. या कारखान्याच्या पंचवार्षिक चेअरमन व संचालक मंडळाची मुदत संपल्याने पश्चिम महाराष्ट्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले होते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन झाले. या निकालाला अनेक कांगोरे आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही महिन्यात मुदत संपणाऱ्या आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील बहुतांश कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. विधानसभा निकालानंतर नवनियुक्त आमदार मनोज घोरपडे यांनी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचा आगामी चेअरमन हा सर्वसामान्य शेतकरी असेल, असे जाहीर करून निवडणुकीच्या षड्डू ठोकला आहे. त्यामुळे कारखान्याचे विद्यमान चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्यामध्ये ‘काटे की टक्कर’ होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे ही निवडणूक दुरंगी होऊन यामध्ये मोठे रंगत निर्माण होणार असल्याने दोन्हीकडील कार्यकर्ते, तसेच कारखान्याच्या सभासदांमध्ये या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
तसेच कारखान्यास राजकीय द्वेषापोटी वेळेत ऊस गळितासाठी न नेल्याने, मयत सभासदांच्या वारस नोंदी न केल्याने, कारखान्यांच्या पाणीपुरवठा योजनांचे पाणी शेतीस वेळेत न मिळाल्यामुळे, निवडणुकीत संधी न मिळाल्यामुळे आदी कारणांनी नाराज असलेल्या सभासदांनी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सभासदांचा हा नाराज गट विरोधकांची हात मिळवणे करणार? की तिसऱ्या आघाडी उघडणार याकडेही सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज गुरुवार (दि २७) फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. बुधवार दि. ५ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच शुक्रवार (दि. ६) मार्च रोजी छाननी होणार असून शनिवार (दि. ७) मार्च ते शुक्रवार दि. २१ मार्च या कालावधीत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. तर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया शनिवार (दि. ५) एप्रिल रोजी पार पडणार असून रविवार (दि. ६) एप्रिल रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

निवडणूक कार्यक्रमाआधीच आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी
या निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही गटातील मार्गदर्शक, पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासदांनी हालचाली सुरू केले असून अनेक ठिकाणी कोपरा बैठका सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकीची वातावरण निर्मिती निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच झाली असून दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे आता अंतिम उमेदवार निश्चित झाल्यानंतर सुरू सुरू होणाऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीकडेही सभासद कार्यकर्त्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.