कृष्णाकाठ /12 मार्च 2025 / अशोक सुतार
आवडते अभिनेते नरेंद्र मोदी !
उत्तर ऐकून चकित झाला ना भाऊ ! पण घटनाच अशी घडली आणि लेखन प्रपंच करावा लागला. राजस्थानमध्ये भाजपाचे विद्यमान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भजन लाल शर्मा यांनी दिलेल्या या उत्तराचा व्हिडीओ सोशल मीडियावरही जोरात व्हायरल होत आहे. या व्हिडीओचा दाखला देऊन काँग्रेसकडून भजन लाल शर्मा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले जात आहे. काँग्रेसच्या राजस्थानमधील नेत्यांसह केंद्रातील नेतेमंडळीदेखील या विधानावरून खोचक टीका करताना दिसत आहेत.
भजन लाल शर्मा यांनी रविवारी जयपूर येथे झालेल्या आयफा अर्थात इंटरनॅशनल इंडिय फिल्म अकॅडेमी पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी भजन लाल शर्मा यांना कार्यक्रमाच्या अनुषंगाने ‘तुमचा आवडता अभिनेता कोण आहे?’ असा प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी हसत ‘नरेंद्र मोदी’ असे उत्तर दिले ! भजनलाल शर्मा यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे हीरो आहेत. म्हणजे अभिनेते आहेत. आयफा सोहळ्यातील वातावरणाचा परिणाम म्हणून शर्मा यांनी मोदींना अभिनेता संबोधले असू शकते. पण लक्षात कोण घेतो ?
भजन लाल शर्मा यांनी दिलेले हे उत्तर विरोधी पक्ष काँग्रेसच्या पथ्यावर पडले. काँग्रेसचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपावर तोंडसुख घेतले आहे. “आम्ही तर हे बर्याच काळापासून सांगत आहोत की, मोदी हे नेते नसून अभिनेते आहेत. उशीराने का होईना, अगदी भाजपाचे मुख्यमंत्रीदेखील हे सांगू लागले आहेत की नरेंद्र मोदी हे जनतेचे नेते नसून अभिनेते आहेत. ते कॅमेरा कौशल्य, टेलिप्रॉम्प्टर, वेशभूषा, मोठमोठी भाषणे यात वाकबगार आहेत, असे दोतासरा यांनी म्हटले आहे. गोविंद सिंग दोतासरा यांनी जे विधान केले आहे, तेही योग्यच वाटते. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण करताना विविध हावभाव, वेशभूषा करतात. ते बोलण्यातही वाकबगार आहेत.
दरम्यान, काँग्रेस नेते पवन खेरा यांनी भजन लाल शर्मा यांचा हा व्हिडीओ शेअर केला असून शर्मा यांना टॅग करून टोला लगावला आहे. भजन लाल जी, तुमचे बरोबर आहे. पंतप्रधान मोदी हे चांगले अभिनेते आहेत. पण तुम्हाला असे वाटत नाही का की कधीकधी ते खूप जास्त ओव्हरअॅक्टिंग करतात? असा खोचक सवाल पवन खेरा यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत, परंतु ते जनतेला अधिक आश्वासने देतात. त्यांनी काही आश्वासने अजूनही अपूर्ण आहेत. ती केव्हा पूर्ण होतील, हे मोदी सांगू शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा म्हटले होते, आम्हाला सत्ता दिली तर प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये रक्कम देणार. त्यांचे अच्छे दिन आएंगे हे वचन तर दरवर्षी आणि कुठल्याही काळात चालणारे वचन आहे. याला‘त्रिकालाबाधित सत्य’किंवा इंग्रजीत युनिव्हर्सल ट्रूथ असे म्हटले जाते. मोदी नेहमीच जनतेला छान छान आश्वासने देतात. ते बोलताना अभिनयही करतात. असे वाटते की, हा माणूस लवकरच आपल्याला आश्वासनपूर्ती करून उपकृत करेल. त्यामुळे विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना उपरोधिकपणे‘अभिनेते’म्हणतात. भजन लाल यांनी मोदींना अभिनेते म्हटल्यामुळे विरोधकांना आता आयतेच कोलीत मिळाले आहे.
काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्षानेही भजन लाल शर्मा यांच्या या विधानावरून मोदींवर टीका केली आहे. आता भाजपाचे मुख्यमंत्री व नेत्यांनाही विश्वास बसला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा मोठा अभिनेता या देशात कधीही झाला नाही आणि कधी होणारही नाही, अशी पोस्ट आपच्या अधिकृत एक्स हँडलवर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीवेळा अचाट वक्तव्ये केली आहेत. जसे की, माझा जन्म जैविक नाही. मला ईश्वराने त्याच्या कार्यपूर्तीसाठी पृथ्वीवर पाठवले आहे.
भारतीय जनता पक्षाकडून मात्र भजन लाल शर्मा यांना तुमचा आवडता हिरो कोण? असा प्रश्न विचारल्याचा दावा करण्यात येत आहे. पण या प्रसंगाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पत्रकारांनी तुमचा आवडता अभिनेता कोण? असा प्रश्न विचारल्याचे ऐकू येत आहे. भजनलाल यांनी, मोदी हे अभिनेते आहेत असे म्हणून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.