वन कार्द्यानुसार कारवाई; वनरक्षक रोहित लोहार यांची कामगिरी, दोनदा वनवे विझविण्यात यश

कराड/प्रतिनिधी : –
पाटण तालुक्यातील मौजे झाकडे येथील राखीव वनक्षेत्रात वणवा लावत असताना एकजण मिळून आला. त्याच्यावर पाळत ठेवून वन विभागाने त्याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन कार्यानुसार कारवाई केली आहे.
नितीन साळुंखे असे याप्रकरणी वन विभागाने कारवाई केलेल्याचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, मौजे झाकडे (ता. पाटण) येथील राखीव वनक्षेत्रात एकजण वणवा लावत होता. त्याने दोनवेळा झाकडे येथील राखीव वनक्षेत्रात वणवा लावल्याची माहिती वनरक्षक रोहित लोहार (मोरगिरी) यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी नितीन साळुंखे या व्यक्तीवर रात्रंदिवस गस्त करून पाळत ठेवली. त्यानंतर शनिवार (दि. १५) रोजी नितीन साळुंखे हा झाकडे येथील राखीव वनक्षेत्रात वणवा लावताना आढळून आला. त्यानंतर वनरक्षक रोहित लोहार यांनी सदर व्यक्ती वणवा लावत असल्याची चित्रफित मोबाईलवर बनवली. तसेच याबाबतची कल्पना पाटण व सातारा वन विभाग कार्यालयास देण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी नितीन साळुंखे त्याच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, दोन ठिकाणी लावलेले वनवे ग्रामस्थांच्या मदतीने वेळीच विझविल्याने मोठे वनक्षेत्र जळण्यापासून वाचवण्यात यश आले आहे. सदरची कारवाई उपवनसंरक्षक अदिती भारदवाज, सहा. वनसंरक्षक (वनीकरण व कॅम्पा) महेश झांजूर्णे, वनक्षेत्रपाल पाटण प्रा. राजेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.