20.6 C
New York
Friday, April 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

उड्डाणपुलाचा सेगमेंट कोसळून दुर्घटना

कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील घटना; दोन कर्मचारी किरकोळ जखमी

कराड/प्रतिनिधी : –

पुणे-बंगलुरु महामार्गावर कोल्हापूर नाका, कराड येथे उड्डाणपुलावर सेगमेंट बसवताना सेगमेंट कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आसपास अन्य कर्मचारी व नागरिक नसल्याने मोठी दुर्घटनात टाळली. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी गर्दी झाल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

नरेंद्र सिंग (वय 28) आणि दिनेश सिंग (वय 29) अशी या दुर्घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बंगलुरु महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या गतीने सुरू आहे. यामध्ये कराड ते नांदलापूर दरम्यान सहापदरी उड्डाणपूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

यांतर्गत शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याचा सुमारास कोल्हापूर नाका येथे उड्डाणपुलावर सेगमेंट बसवण्याचे काम सुरू होते. सेगमेंट बसवण्यासाठी सेगमेंट लॉन्चर मशीन फिट केल्यानंतर ३३ टन वजनाचा सेगमेंट ग्राउंड फ्लोअरला ठेवण्यात आला. यावेळी सेगमेंट लॉन्चर मशीनचा ऑपरेटर आणि अन्य कर्मचारी सेगमेंटवर उभे होते. त्यानंतर लॉन्चर मशीनने सेगमेंट उचलण्यास सुरुवात केली. मशीनने सेगमेंट उचलताना तो निसटून खाली कोसळला. दरम्यान, सेगमेंटवर उभे असलेल्या दोघांनी खाली उड्या टाकल्या. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेवेळी सदरच्या कामावर असणारे अन्य कर्मचारी व आसपासचे नागरिक त्याठिकाणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

दरम्यान, सेगमेंट खाली कोसळल्यामुळे जोरदार आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महामार्गावरून प्रवास करणारे अनेक वाहनचालकही त्याठिकाणी थांबले होते. त्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

उड्डाणपुलावर सेगमेंट बसवताना तो कोसळल्याने मोठा आवाज झाला. यामुळे आसपासचे नागरिक त्याठिकाणी धावल्याने मोठी गर्दी झाली होती. सदर काम चालू असलेल्या ठिकाणी अन्य कर्मचारी व नागरिक नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, सदर सेगमेंट बसवताना त्याठिकाणी तज्ञ अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने, तसेच सदर कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे.

– दादासाहेब शिंगण (कराड तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या