12 C
New York
Friday, April 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

पोस्टाच्या योजनांचा प्रसार आणि महत्व

18मार्च 2025 / कृष्णाकाठ / अशोक सुतार

पोस्टाच्या योजनांचा प्रसार आणि महत्व

 

सध्याच्या जमान्यात पोस्टमन, पोस्टकार्डे, पत्र कमी झाली आहेत आणि त्याची जागा ईमेल, सोशल मीडियाने घेतली आहे, असे तुम्हाला वाटते ना ? भारत सरकारच्या डाक विभागाने पुन्हा एकदा जोमाने पूर्वीचे वैभव प्राप्त करायला सुरुवात केली आहे. सध्या तुम्ही बचत कुठे करता, याला महत्व येत आहे. परंतु विश्वासार्हतेच्या दृष्टीने बचत करायची झाल्यास एलआयसी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ, पोस्ट ऑफीसच्या सर्व योजना हे नाव प्रकर्षाने आठवते. ग्राहकाला पोस्टाची विश्वासार्हता महत्वाची वाटते. डाक विभागाने नागरिकांच्या सुरक्षित गुंतवणुकीसाठी काही आकर्षक योजना आणल्या आहेत. कराडचे नवनिर्वाचित डाक अधीक्षक बी. पी. एरंडे यांच्याशी झालेल्या बातचीतमधून पोस्टाच्या योजना कशा, किती कालावधीच्या आणि बचतीचे फायदे काय याबाबत माहिती मिळाली. ही माहिती नागरिकांच्या दृष्टीने महत्वाची वाटली.

कराड मुख्य पोस्ट कार्यालयाच्या अंतर्गत पाच विभाग येतात. खटाव, माण, पाटण, कोरेगाव आणि कराड असे ते पाच विभाग आहेत. प्रत्येक घरात पोस्ट विभागाच्या योजना पोहोचणे महत्वाचे आहे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकारचा स्तुत्य उपक्रम असून पोस्ट कार्यालयाच्या या योजना वृद्ध, बालिका, स्त्रिया यांच्यासहीत तरुण – तरुणींना लाभदायक ठरणार आहेत. तसेच पोस्टाच्या बचत योजनांवरील व्याजदर हे थक्क करणारे आहे. तसेच पोस्टाची विमा योजना खात्रीशीर, किफायतशीर आहे, अशी माहिती कराड मुख्य पोस्ट कार्यालयाचे डाक अधीक्षक बाळकृष्ण पोपट एरंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गावोगावचे पोस्टमन, पोस्टमास्तर यांना डिजिटल मोबाइल, प्रिंटर दिला जाणार आहे. या आधुनिक साधनांमार्फत गावागावांत स्पीड पोस्ट, पार्सल सेवा सुरू करण्याचा मनोदय डाक विभागाचा आहे, असे कराडचे डाक अधीक्षक एरंडे यांनी जाहीर केले आहे.

आता पोस्ट कार्यालयात कुणीही नागरिक गेला तर त्याला पोस्ट बँक किंवा योजनेतील रकमेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आधार लिंक पेमेंटची सोय डाक विभागाने केली आहे. तसेच बाल आधार कार्ड हे मोफत काढून मिळणार आहे. त्यासाठी लहान मुलांची आवश्यक माहिती दिली तर बाल आधार कार्ड लवकर काढून मिळणार आहे. तसेच पोस्टामार्फत नागरिकांचा अपघात विमा दरवर्षी ७५५ रुपये भरून काढला जातो. केंद्र सरकारने ही योजना राबवली आहे. अपघातात मृत्यूमुखी किंवा गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला १५ लाखापर्यंतचा कमाल लाभ मिळतो. या प्रकारची योजना इतर खासगी विमा कंपन्यांमध्ये आढळत नाही. परंतु खासगी विमा कंपन्यांचा जाहिरातबाजीवर जोर असतो, त्यामुळे त्या कंपन्यांकडे नागरिक आकर्षित होतात. पोस्टाची विमा योजनेचा अल्प किंमतीतील विमा पाहील्यास कमी रकमेत मोठा लाभ असा आहे. डाक विभागाच्या सर्व योजना अस्सल, अल्प किंमतीत जास्त रक्कम मिळवून देणार्‍या आहेत. परंतु या योजनांचा योग्यरीत्या प्रचार झाल्यास योजनांचे भविष्य जोरात आहे आणि नागरिकांना फायदेशीर ठरतील अशा या योजना आहेत.

खेडेगावांत सध्या अनेक सहकारी बँका, पतसंस्था आहेत. परंतु कुठे गुंतवणूक करावी, हे गावातील नागरिकांना माहीत नाही. आपले गुंतवलेले पैसे बुडाले तर काय होणार ? असा विचार अनेकांच्या मनात येतो. अशावेळी पोस्ट कार्यालयातील विविध योजनांत किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत गुंतवणूक करणे हा मोठा पर्याय नागरिकांना उपलब्ध आहे. यात महत्वाचे म्हणजे फसवणूक होणार नाही, गुंतवलेल्या रकमेवर जास्त व्याज मिळेल आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील अकाऊंटमुळे सबसिडी, व्याजदराचे लाभ मिळतील. त्यामुळे पोस्टाच्या या बँकेत नागरिकांची गुंतवणूक झाल्यास कुठलीही फसवणूक होणार नाही आणि विश्वासार्हता जपली जाईल. इतर खासगी कंपन्यांसारखी पोस्टाच्या गुंतवणुकीला टर्म, कंडिशन लागू नाही. पोस्टातर्फे गावोगावी पोस्टाच्या विविध योजना सांगितल्या गेल्या तर ग्रामस्थांचा मोठा पाठींबा मिळणार आहे. शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांना या योजणांतील परतावे आकर्षित करतील असे आहेत.

कराडचे डाक अधीक्षक बाळकृष्ण पोपट एरंडे हे नुकतेच कराड पोस्ट कार्यालयात रुजू झाले आहेत. पोस्टाच्या योजना, त्यांचे व्याज दर जास्त असूनही या योजनांचा प्रसार खेडोपाडी न झाल्यामुळे पोस्टात लोक जास्त प्रमाणात गुंतवणूक करत नाहीत, अशी खंत डाक अधिक्षकांनी व्यक्त केली. ते खंत व्यक्त करून थांबलेले नाहीत तर त्यांनी कराड डाक विभागांतर्गत येणार्‍या सर्व तालुक्यांत डाक योजनांचा प्रसार करण्यासाठी कृती कार्यक्रम आखला आहे. सध्या पोस्टात सुकन्या योजना, महिलांसाठी विविध बचत योजना आणि त्यावर भरपूर व्याज दर आहेत. याचा लाभ काही महिलाच घेत आहेत. ही योजना गावोगावी पोहोचवली तर सर्वत्र पोस्टाच्या योजनांचे स्वागतच होईल. काही आघाडीच्या कंपन्यांशी संलग्न राहून पोस्टातर्फे समाजातील होतकरू लोकांना कर्ज मिळवून देण्याची योजना लवकरच येत आहे. त्याद्वारे गरजू, गरीब लोकांना व्यवसायासाठी, घरांसाठी कर्ज मिळणार आहे. डाक अधीक्षक एरंडे यांनी म्हटले आहे की, सर्वांनी पोस्ट लाईफ इन्शुरन्सचा अभ्यास करावा, या योजनेचा फायदा घ्यावा. पोस्ट लाईफ इन्शुरन्सची योजना इतर सर्व इन्शुरन्सपेक्षा अधिक प्रभावी आहे. तसेच पोस्टाच्या विविध योजना, इन्शुरन्स योजना यांची माहिती व प्रसार करण्यासाठी विभागातील गावोगावच्या सरपंच, ग्रामस्थांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहोत. लवकरच त्यांच्या प्रयत्नाला यश मिळेल आणि नागरिकांना योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्याचा आनंद मिळेल, ही सदिच्छा !

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या