कृष्णाकाठ / 17 मार्च 2025 / अशोक सुतार
विश्वव्यापी तुकारामांची गाथा
तुकाराम बीज नुकतीच झाली आहे. संत तुकारामांच्या ‘अभंगा’चे गारुड अजूनही मराठी माणसाच्या मनावर आहे. संत तुकारामांचे अभंग त्याकाळी इंद्रायणी नदीत बुडाले असे सांगितले जाते. काही जनाचा असा कयास आहे की, ते अभंग इंद्रायणीच्या नदीत बुडवले गेले. असे असले तरी संत तुकारामांच्या अभंगाची मोहिनी आजही खास आहे. असे अभंग आज तरी लिहिणारा कोणी माई का लाल पैदा नाही झाला. अभंगातील स्पष्टोक्ती, रूपक अलंकार, गेयता, भाषा सौंदर्य, बहूअर्थता दुसर्या कोणत्याही काव्यात आढळणे कठीण ! म्हणूनच साधे, सोपे अभंग मराठी मनांवर अजूनही प्रभाव ठेवून आहेत. संत तुकारामांसारखा खेड्यातील एक प्रतिभावंत कवी बहुजन समाजात जन्म घेतो आणि जनमानसावर प्रभाव निर्माण करतो, हेच कारण तत्कालीन उच्चवर्णीयांना खटकले नसावे ? असा प्रश्न निर्माण होतो. संत तुकारामांचे महानपण तुकारामांच्या गाथेमध्ये पानोपानी जाणवते तसेच विदेशांतील कवींनाही जाणवते.
संत तुकारामांची गाथा हा संशोधनाचा विषय ठरतो. कारण या गाथेतील शेकडो अभंगांनी बहुजनांच्या तत्कालीन दु:खाला वाचा फोडली. अंधश्रद्धा, कर्मकांड, जीर्ण परंपरा, जातिभेद यांना अभंगांच्या रचनेत शब्दबद्ध करणार्या आणि बहुजनांना शहाणे करणार्या तुकारामांचे वावडे काही मोजक्या लोकांना होते. संत तुकारामांना शेकडो अभंग असणारी ही गाथा तुकोबांना स्वहस्ते का बुडवायला सांगण्यात आली, हा प्रश्न महत्त्वाचा आहे; तितकाच दूसरा प्रश्न आहे, तो म्हणजे चारशे वर्षांनंतरही या गाथेची जादू ओसरलेली नाही. इंद्रायणीच्या डोहात बुडालेली गाथा भारतभर भ्रमण करून जगभरात पोहोचली कशी हा प्रश्न निर्माण होतो.
संत तुकोबांच्या काळात तंत्रज्ञान नव्हते. त्यांनी हस्तलिखित ग्रंथ आणि कीर्तनासारख्या माध्यमातून अध्यात्माचा आणि सुविचारांचा मौखिक प्रचार केला. तुकोबांची गाथा बुडवण्यात आल्यानंतर तेरा दिवसांनी ती आपोआप तरली, असे म्हटले जाते. परंतु त्यात तथ्य असेलच असे नाही. कारण पाण्यात बुडवलेली तुकारामांची गाथा टिकून कशी राहील, असा प्रश्न पडतो. संत तुकारामांचे पहिले सविस्तर चरित्र महपती ताहराबादकर यांनी लिहिले होते. हे चरित्र तुकारामांच्या निर्वाणानंतर तब्बल दीडशे वर्षांनंतर लिहिण्यात आले होते. त्यात काही ऐकीव माहिती असावी, असे वाटते. तुकोबांच्या या गाथेबद्दल लेखक दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे कविवर्य आपल्या ‘तुकोबांचे वैकुंठगमन’ या पुस्तकात लिहितात की, लोकपरंपरेनुसार आणि वारकऱ्यांच्या मौखिक संस्कृतीत तुकोबा एक वंद्य संतपुरुषच नव्हेत तर एक अवतारी महात्मा होते. पांडुरंगाचे कृपाछत्र त्यांच्यावर कायम असल्यामुळे संकटकाळी काही ना काही चमत्कार करून विठोबा आपल्या ह्या प्रिय भक्ताची सही सलामत सुटका करत असे अशा अर्थाच्या अनेक आख्यायिका उत्स्फूर्तपणे लोकांनी निर्माण केल्या. गाथेच्या जलदिव्याची कहाणी सांगताना कविवर्य चित्रेंनी म्हटले आहे की, अन्नपाणी वर्ज्य करून तुकोबांनी पांडुरंगाला निर्वाणीची आण घातली आणि त्यांच्या बुडालेल्या वह्या ‘उदकीं कोरड्या’ राहिलेल्या सहीसलामत बाहेर आल्या. आज देहूच्या देऊळवाड्यात तुकोबांच्या वारसांकडे आलेली जी एक अनेक पाने गहाळ झालेली वही आहे तिला ‘भिजकी वही’ म्हणूनच ओळखण्यात येते. दिलीप चित्रे पुढे म्हणतात की, तुकोबांचा तेरा दिवसाचा ‘सत्याग्रह’ लोकांना संघटित करणारी क्रांतीकारक कृती होती. त्यांचे विरोधक घाबरले. ज्या वह्या आपण बुडवल्या असे त्यांनी जाहीर केले होते त्या तरंगून वर आल्या असे त्यांनाच जाहीर करावे लागले. त्या बुडवण्याची हिंमत त्यांना न झाल्याने त्या सुरक्षितच होत्या.
संत तुकारामांच्या गाथेचे जलदिव्य म्हणजे मराठी काव्याच्या आणि संस्कृतीच्या इतिहासातली एक क्रांतीकारक घटना आहे. वेदांचा अधिकार नसलेल्या शूद्रांचे विचारस्वातंत्र्य आणि अविष्कारस्वातंत्र्य पुकारणारी आणि स्थापित करणारी ती महत्त्वाची घटना आहे. संत तुकामांच्या काळात छपाई तंत्रज्ञान नव्हते. त्यामुळे, लोक अशा हस्तलिखित गाथा नकलून घ्यायचे. म्हणजे हस्तलिखिताची नक्कल प्रत तयार करायचे. तत्कालीन भाविकांनी तुकारामांच्या गाथेतील पाने नकलून नेली, असे संत तुकारामांचे चरित्रकार महिपती सांगतात. तुकोबांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक असलेले संताजी तेली जगनाडे, गंगाधरपंत मवाळ आणि संताजींचे चिरंजीव बाळोजी हे तुकारामांच्या कीर्तनात उत्स्फुर्तपणे निघालेले अंभग टिपून घेण्याचे काम करायचे. संताजींच्या नकल हस्तलिखित प्रतींमधील तेराशे अभंग वि. ल. भावे यांनी प्रकाशित केले. बाळोजींचे हस्तलिखित अप्रकाशित आहे. ‘जगनाडे संहिता’ मध्ये तुकाराम महाराजांच्या एकूण अभंगांपैकी निम्म्याहूनही अधिक अभंग दिसत नाहीत.
दरम्यानच्या काळात, वेगवेगळ्या फडांवर मौखिक परंपरेतून पुढे चालत आलेले तुकोबांचे अभंग जतन होत राहिले. त्यामुळे, वेगवेगळ्या फडांच्या वेगवेगळ्या गाथा सिद्ध होत गेल्या. इंग्रज सरकारने, संत तुकाराम हे राष्ट्रीय कवी असल्याने या धारणेतून त्यांनी गाथेचे हे काम शंकर पांडुरंग पंडित यांच्याकडे सोपवले. इंदुप्रकाश या छापखान्याने या गाथेचा पहिला भाग 1869 तर दुसरा भाग 1873 रोजी प्रकाशित केला. आज जी आपण गाथेची शासकीय प्रत म्हणून संदर्भासाठी वापरतो, ती हीच आहे. या गाथेत तुकोबांचे जवळपास साडेचार हजार अभंग समाविष्ट आहेत. पहिली शासकीय गाथा वारकऱ्यांना मान्य व्हावी यासाठी तत्कालीन प्रसिद्ध वारकरी कीर्तनकार ह.भ.प. भाऊसाहेब काटकर यांचे शिफारसपत्र गाथेला जोडलेले आहे. तुकोबांच्या अभंगांमधील काही अभंग अत्यंत बंडखोर, पुरोगामी आणि प्रस्थापित धर्मव्यवस्थेला हादरे देणारे आहेत तर काही सनातनी, जातीवाचक आणि परंपरागत मानसिकतेला कवटाळणारे आहेत.