कराड/प्रतिनिधी : –
यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जांमधील मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात यांच्या अर्जांवर हरकत घेण्यात आली. त्यांनतर छाननीत दोन्हीही अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यांतर दोन्ही उमेदवारांनी प्रादेशिक (साखर) सहसंचालिका नीलिमा गायकवाड यांच्याकडे अपिल केले. याचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये निवासराव थोरात यांचा अर्ज वैध ठरला असून मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज बाद झाल्याची माहिती संजयकुमार सुद्रीक यांनी दिली. या निकालामुळे सत्ताधाऱ्यांना धक्का बसला असून विरोधकांना दिलासा मिळाला आहे.
सह्याद्रि कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवार (दि २७) फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. बुधवार (दि. ५) मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत होती. या मुदतीत एकूण २५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जांची छाननी गुरुवार (दि. ६) मार्च रोजी निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा यादव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक राहूल देशमुख, सहाय्यक निबंधक (प्रशासन) संजय जाधव यांच्या उपस्थितीत झाली.
दरम्यान, दाखल अर्जांची छाननी सुरु असताना मुरलीधर गायकवाड यांनी निवास थोरात यांच्या अर्जावर, तर वसंतराव जगदाळे यांनी मानसिंगराव जगदाळे यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. त्याची सुनावनी निवडणूक निर्णय अधिकारी सुद्रीक यांच्यासमोर झाली. त्यामध्ये मानसिंगराव जगदाळे व निवासराव थोरात यांच्या बाजूने त्यांच्या-त्यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला होता. त्यानंतर शुक्रवार (दि. ७) रोजी संजयकुमार सुद्रीक यांनी दोघांचेही अर्ज बाद ठरवले होते. त्यामुळे या दोघांसह १० जणांनी प्रादेशिक साखर सहसंचालक निलीमा गायकवाड यांच्याकडे अपिल दाखल केले होते. या अपिलाचा निकाल मंगळवार (दि. १८ रोजी) जाहीर झाला आहे. यामध्ये निवासराव थोर यांच्यासह संबंधित नऊ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे.