कृष्णाकाठ /०३अप्रिल२०२५ / अशोक सुतार
जलप्रदूषणामुळे पाण्याचा स्त्रोत धोक्यात !
वडोली निळेश्वर गावातील तलावात मृतावस्थेत मासे तरंगताना आढळले
कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर गावातील तलावामध्ये मृत अवस्थेत मासे तरंगताना आढळले. तलाव हे तर जलचर प्राण्यांचे वस्तीस्थान ! परंतु तलावातच मासे मृत्यूमुखी पडल्यामुळे तेथील पाणी दूषित झाले आहे काय ? त्या पाण्यात विषारी पदार्थ कुणी मिसळले का ? असे अनेक प्रश्न तेथील गावकर्यांना पडले आहेत. गावाच्या तलावात गुरेढोरे, जलचर प्राणी असतात. जलचरांचा अधिवास याच तलावात आहे; परंतु जिथे राहतात त्यांनाच धोका असल्यास तिथे मानवी हस्तक्षेप होत आहे का, हाही प्रश्न आता निर्माण होत आहे. या तलावात मासे व इतर जलचर प्राणी होते. परंतु आता तेथील जलचरांचे राहणे धोकादायक बनले आहे. या तलावात गावातील गुरेढोरे डुंबतात, तेथील पाणी पितात. त्यामुळे गुरांना या पाण्यापासून काही धोका आहे का, असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या तलावातील पाणी गावाच्या विहिरीत येते. त्यामुळे ग्रामस्थांना धोका होऊ शकतो, अशी तेथील ग्रामस्थांची भावना आहे. तलावातील पाण्याचे व मृत माश्यांचे नमुने प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत आणि ते तपासणीसाठी पुढे पाठवले आहेत. ही तपासणी झाल्यानंतर काय ते समजेल. परंतु या घटनेमुळे वडोली निळेश्वरचे ग्रामस्थ चिंतेत आहेत.
वडोली निळेश्वर गावच्या तलावातील मासे मृत अवस्थेत तरंगत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या तलावातील पाण्यामुळे जनावरांना व लोकांना विषबाधा होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या तलावातील मासे मृत्यूमुखी कसे पडले याचे कोडे गावकर्यांना पडले आहे. या ठिकाणी तलावातील मासे मृतावस्थेत दिसल्यामुळे तेथील ग्रामस्थ मानसिंग मदने यांनी म्हटले आहे की, दोन ते तीन दिवसांपूर्वी या ठिकाणी मृत अवस्थेत मासे सापडत आहेत. मृत माश्यांमुळे तलाव परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याची माहिती आम्ही ग्रामपंचायत व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली; त्यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून तलावातील पाणी परीक्षणासाठी व तपासणीसाठी पाठवले आहे.
मसूर विभाग सरकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर रूपाली कांबळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, वडोली निळेश्वर येथील तलावातील मृत मासे व पाणी परीक्षण करून त्याचे नमुने घेऊन पाणी तपासणीसाठी पाठवले आहे. त्याचा अहवाल लवकरच येईल. यावर प्राथमिक उपयोजना म्हणून तलाव परिसर स्वच्छ करणे व मृत माशांची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत. ग्रामस्थांनी अहवाल येईपर्यंत, तलावातील पाणी जनावरांसाठी व पिण्यासाठी वापरू नये. ग्रामस्थांनी आपली व गुरांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकार्यांनी केले आहे. अहवाल आल्यानंतर त्याची सविस्तर माहिती देऊ, असे डॉ. रूपाली कांबळे यांनी सांगितले आहे.या घटनेनंतर ग्रामस्थ, वैद्यकीय अधिकारी आणि सरपंच यांनी गावच्या तलावाला भेट देऊन प्रत्यक्षात पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
या तलावामध्ये हणबरवाडी – धनगरवाडी योजनेतून मध्यंतरी पाणी सोडले होते, त्यामुळे जवळजवळ ४० ते ५० टक्के पाणी शिल्लक आहे. पण उन्हाळ्यामुळे तलावाची पातळी खालवली आहे. १९७२ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळात वडोली निळेश्वर येथील याच तलावाने गावाला नवसंजीवनी देऊन पिण्याच्या पाण्याच्या टंचाईपासून दिलासा दिला होता, असे काही जुन्या जाणकार वृद्ध ग्रामस्थांनी म्हटले आहे. या तलावातील पाण्यावर अनेक विहिरी अवलंबून आहेत. गावची पिण्याच्या पाण्याची विहीरही याच तलावावर अवलंबून आहे. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाने यावर लवकर उपाययोजना करावी, अशी माहिती सरपंच भीमराव मदने यांनी दिली. यावेळी संभाजी पवार, मानसिंग मदने, अमित पवार, शहाजी मदने, धनाजी मदने, अमोल पवार, पिंटू शेवाळे, सुरेश पाटील, आरोग्य सेवक यु. एम. खेडकर, गणेश लेंडवे घटनास्थळी उपस्थित होते.
तलावातील मृत मासे पाहण्यासाठी तलाव परिसरात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तलावातील मासे मृत्यूमुखी पडणे हे मोठ्या जलप्रदूषणाचे लक्षण असून जि. प. प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. तलावात अनेकजण स्वत: च्या वाणिज्य लाभासाठी मासे सोडतात. तलावात सोडलेल्या माशांचे संवर्धन करून या माशांची पुन्हा बाजारात विक्री केली जाते, असे समजते. परंतु या तलावातील मासे नेमके कशामुळे मृत्यूमुखी पडले, हे कोडे मृत माशांचा व पाण्याचा अहवाल आल्यानंतरच समजणार आहे. उन्हाळ्यात वडोली निळेश्वर गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असताना तलावात जलप्रदूषण होणे गंभीर आहे. त्यामुळे साड्या तरी पिण्याच्या पाण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने याबाबत अधिक जागरूक होणे काळाची गरज आहे. १९७२ साली दुष्काळात वरदान ठरलेला हा तलाव प्रदूषणाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे ग्रामस्थांनीच आता पाण्याच्या स्त्रोताची काळजी घेतली पाहिजे, असे वाटते.