कृष्णाकाठ / Tuesday 8 Apr 2025/ अशोक सुतार
गॅस- इंधन दरवाढ !
देशात एकीकडे महागाईने उच्चांक गाठलेला आहे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरांत वाढ होत आहे. यातच पेट्रोल डिझेलच्या किमतींबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरील उत्पादन शुल्क वाढवले आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२५ च्या पूर्वार्धात गॅस व इंधन दर वाढले होते. त्यावेळीही सर्वसामान्य लोक प्रभावित झाले होते. इंधन दर किंवा घरगुती इंधन दरात वाढ झाली की जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतात, याचा अनुभव सर्वसामान्य माणसाला येतो. त्यामुळे संसाराचे आर्थिक गणित बिघडते. त्यामुळे पेट्रोल – डिझेलचे दर वाढले तरी नागरिकांचे त्यावर लक्ष असते.
केंद्र सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. हे बदल आज म्हणजे मंगळवारपासून लागू होणार आहेत. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १३ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. केंद्र सरकारने अधिकृत अधिसूचना काढून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवणार असल्याची घोषणा केली. आज दि॰ ८ एप्रिलपासून हे शुल्क वाढवण्यात येत आहे. पेट्रोल व डिझेलवरील करामध्ये वाढ केल्याने इंधन दर वाढले आहेत. पेट्रोल व डिझेल हे इंधन दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी आवश्यक आहे. त्याचे दर वाढल्यावर अनेक गोष्टी महाग होण्याची शक्यता आहे. उत्पादन शूलकात वाढ केल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर नकीच परिणाम होऊ शकतो. या वस्तु महाग होणार हे निश्चित ! त्याचा परिणाम म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागली.
उत्पादन शुल्कात वाढ केल्याने किरकोळ किमतींवर काय परिणाम होईल, हे आदेशात सांगण्यात आलेले नाही. परंतु, उद्योग सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, किरकोळ किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आधीच कपात झालेली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क वाढीचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. असे जारी असले तरी भारतीय बाजारपेठेत वाढलेल्या इंधन दराचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. इंधन दर वाढले म्हणजे प्रवास खर्च वाढणार, प्रवास खर्च वाढला की दळणवळणाचा खर्च वाढला आणि दळणवळणाचा खर्च वाढला की, बाजारातील वस्तु महाग होणार हे ठरलेले आहे. आपण ज्या वस्तु बाजारातून खरेदी करतो, त्या वस्तु होलसेल व्यापार्याला ट्रकसारख्या मोठ्या वाहनातून पोहोच होतात. त्याचा खर्च वाढला की, व्यापारी वस्तूंचे दर वाढवणार. हे चक्र गरिबाच्या झोपडपट्टीपर्यंत सुरू रहाते.
अमेरिकेने आयात शुल्क लादल्याने शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. तसेच, इतर उत्पादनांवरीलही किमती वाढण्याची शक्यता आहे. असे असताना केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवल्याने याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या किरकोळ किमतीवर झाल्यास सामान्य नागरिकांचे बजेट बदलण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवासासह इतर अनेक सेवा सुविधा महाग होतील.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटले आहे की, आज उत्पादन शुल्क दरात वाढ झाल्यानंतर, पीएसयू तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे कळवले आहे. जागतिक तेलाच्या किमती घसरल्यामुळे डिसेंबर २०२४ मध्ये सरकारने स्थानिक पातळीवर उत्पादित कच्च्या तेल आणि इंधन निर्यातीवरील अनपेक्षित नफा कर काढून टाकला होता. केंद्र सरकारने आता उत्पादन शुल्क इंधंनावर लादले आहे. पेट्रोल – डिझेलवर अनेक कर असतात. यात पर्यावरण करही ग्राहकाच्या माथी मारलेला असतो. इंधनावर १३ प्रकारचे कर लागू केले जातात. जागतिक तेल बाजारात इंधर दर कमी झाले तरी केंद्र सरकार अनेकवेळा 13 पैकी काही कर लावून इंधन दर वाढवते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कमी असले तरी भारतासारख्या देशात इंधन दर महाग असतात.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर आतासामान्यांना सरकारने आणखी एक झटका दिला आहे. ८ एप्रिलपासून गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. सरकारने घरगुती वापरासाठीचा एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपये महाग केल्याचे जाहीर केले आहे. उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत ५०३ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता ५५३ रुपयांना मिळणार आहे तर ही योजना सोडून असलेला एक सिलिंडर ८०३ रुपयांवरुन ८५३ रुपये इतका झाला आहे.
काही महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाने इंधन दरवाढ, बसच्या सुट्या भागांची वाढलेली किंमत, महागाई भत्त्यात झालेली वाढ यामुळे एसटीच्या बस प्रवासात १४.९५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागला होता. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ होणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार रिक्शा आणि टॅक्सीची भाडेवाढ झाली आहे. सध्या सर्वत्र जीवनावश्यक गोष्टींची महागाई झाली आहे. सध्या इंधन दराने शंभरी पार केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही दिलासा मिळालेला नाही. परंतु कोणतीही निवडणूक जवळ आली की केंद्र सरकार इंधनाचे दर कमी करते हे विशेष आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाने कसे जगायचे हा प्रश्न निर्माण होत आहे. कारण सर्वसामान्य माणसाची कमाई न वाढता महागाई जास्त वाढली आहे.