कृष्णाकाठ / दि. १० एप्रिल २०२५ / अशोक सुतार
वादाच्या भोवर्यात ‘फुले’ चित्रपट !
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। – महात्मा ज्योतिबा फुले.
महात्मा ज्योतिबा फुलेंनी असे अनेक अभंग लिहिले आहेत, फुले या रचनेला‘अखंड’ असे म्हणत. अखंड म्हणजे अशी वचने, जी कधीही जुनी होणार नाहीत किंवा वैचारिकरीत्या भंग पावणार नाहीत, ती अखंड सुरू राहतील. महात्मा फुल्यांचे समाजकारण उदात्त आहे आणि निर्विवाद आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समाजाला मानवता व सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘फुले’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत व अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा राव अनुक्रमे महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. दि. ११ एप्रिल १८२७ रोजी महात्मा फुले यांचा जन्म झाला होता. उद्या म्हणजे दि. ११ एप्रिल रोजी म. फुलेंची १९८ जयंती साजरी होईल. त्यानिमित्ताने जयंतीदिनी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा उद्देश चित्रपट निर्मात्यांचा होता. परंतु चित्रपटाच्या ट्रेलरवरुन सर्वत्र वाद निर्माण झाल्यामुळे प्रदर्शन पुढे ढकलले आहे.
काही दिवसांपूर्वी ‘फुले’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून वादाला तोंड फुटले आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आरोप केला आहे की, ‘फुले’ चित्रपटाच्या निर्मात्यांना ट्रेलरमधून वेगळे चित्र दाखवत पुन्हा जातीवाद करायचा आहे. चित्रपट वास्तवाला धरून नसेल तर हा चित्रपट योग्य नाही. या वादादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन व निर्माते रितेश कुडेचा यांनी माजी राज्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यानंतर रितेश कुडेचा यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केळे. रितेश कुडेचा यांनी म्हटले आहे की, ‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता २५ एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या दोन दिवसाआधी ‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे की, ‘फुले’ चित्रपटाचं आम्ही मनापासून स्वागतच करतो. असे चित्रपट झाले पाहिजे. पण, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक ब्राह्मण मुलगा सावित्रीबाई फुले यांच्यावर दगड-शेण फेकताना दिसला आहे. हा प्रकार दाखविण्यास आमचा विरोध नाही. तत्कालीन समाजाच्या हातून अशी काही पातके घडली असतील. परंतु महात्मा जोतीराव फुल्यांना शाळेसाठी मदत, देणगी देणारी लोक, शाळेत शिक्षक म्हणून जाणारे लोक, शाळेच्या पहिल्या तुकडीत सहा पैकी चार विद्यार्थी ब्राह्मण होते. हादेखील चित्रपटात उल्लेख आहे का? आणि उल्लेख असेल तर ते ट्रेलरमध्ये का नाही दाखवले गेले? असा आमचा सवाल आहे.
‘फुले’ चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी आणि पत्रलेखा राव या दोघांनी विशेष तयारी केली आहे. फुले चित्रपटानिमित्त आनंद दवे यांनी उपस्थित केलेले प्रश्न रास्त आहेत. परंतु ट्रेलरमध्ये चित्रपटाचा सार/ अर्क असतो. त्यामुळे म. फुलेंच्या जीवनात घडलेल्या महत्वाच्या घटना पाहिल्या तर त्यांनी तत्कालीन सनातनी लोकांशी केलेला संघर्ष होय. या संघर्षादरम्यान सर्वच लोक त्यांच्याशी वाईट वागले असे नाही. त्यांचे काही ब्राम्हण मित्रही होते, काही ब्राम्हण मित्रांनी त्यांना समाजकार्यासाठी आर्थिक मदतही केली आहे. परंतु फुलेंचे जे काही ब्राम्हण मित्र होते, त्यांचाही दुस्वास तत्कालीन समाजात झाला होता. हे कसे विसरता येईल ? महात्मा फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. त्याच्याही पुढे जात त्यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रिया व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले होते. त्यांचे सत्यशोधक विचार पोहोचविण्यासाठी ‘सत्यशोधक समाजा’ ची स्थापना केली होती. म. फुलेंना सामाजिक समता अभिप्रेत होती. तेच त्यांचे ध्येय होते. परंतु अजूनही समाज अंधश्रद्धा, जातीभेद, गरिबांचे शोषण,गुलामगिरी, जीर्ण परंपरा यात गुरफटला आहे. आता दुर्दैवाने, हाच समाज पुन्हा रानटीपणाकडे जात आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले इथून पुढच्या पिढीला पचणे ही सर्वसामान्य बाब नाही.
शेतकर्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी तत्कालीन सावकारी किंवा सरंजामशाही व खोतशाही नष्ट करण्यासाठी लिहिला होता. भिडे वाडा, बुधवार पेठ, पुणे येथेच १ जानेवारी १८४८ रोजी फुले दांपत्यांनी मुलींची शाळा सुरू केली होती. त्यावेळी स्त्रियांना व शुद्रांना शिक्षण घेण्याचा हक्का व अधिकार नव्हता. त्यामुळे तत्कालीन प्रस्थापितांकडून फुले दाम्पत्याची विटंबना झाली होती, हे मान्य केलेच पाहिजे. अँतोनियो ग्राम्सी या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने महात्मा फुले यांना ‘सेंद्रिय बुद्धिवंत’ असे संबोधले आहे.
देव, धर्म , चातुर्वण्यवाद व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे, असे रोखठोकपणे बोलणारे फुले तत्कालीन प्रस्थापितांच्या टीकेचे धनी झाले. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात महात्मा फुले यांचा मोठा वाटा होता. सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥ हे सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ३ डिसेंबर २००३ रोजी नवी दिल्लीतील संसद भवन येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा राजकीय उल्लेख अशासाठी करत आहे की, तत्कालीन भाजपला महात्मा फुल्यांचा पुतळा संसद भवनात बसवण्यास आक्षेप नव्हता. परंतु आता महात्मा फुले यांच्या चरित्रपटाला विरोध करण्यासाठी अनेकजण रस्त्यावर उतरत आहेत. कुठल्याही व्यक्तीचे विचार कोणी उद्ध्वस्त करू शकत नाही. महात्मा फुले यांचे विचार पूर्वी ज्यांना पटत नव्हते, त्यांनी फुले यांची जिवंतपणे विटंबना केली होती. आत्ताही तोच प्रकार होत असेल तर काय करायचे ? समाज बदलला आहे की पुन्हा रानटी अवस्थेत शिरू पाहत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.