कृष्णाकाठ/ दि. १४ एप्रिल २०२५ / अशोक सुतार
पवारांचा सुसंवाद
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नुकतेच सातार्यात येऊन गेले. शरद पवारांचा पूर्वीपासूनच सातारा जिल्हयावर भरवसा मोठा, त्यांचे राजकीय गुरुही कराडचे म्हणजे सातारा जिल्ह्यातले ! महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय तालमीत तयार झालेल्या पवारांनी भल्या भल्या पैलवानांना आसमान दाखवले आहे. तो काळ जुना असला तरी इतका जुना नाही. पाच वर्षांपूर्वी शरद पवारांनी महाराष्ट्रात फिरून तत्कालीन विधानसभा निवडणुकीत महा विकास आघाडीच्या सर्वपक्षीय शिलेदारांमध्ये आत्मविश्वास आणि लढण्याचे बळ दिले होते. पवारांना राजकारणातला वस्ताद म्हटले जाते, ते उगीच नाही. परंतु राज्यातील शिलेदारांमध्ये फंदफितुरी झाली आणि राज्यातले पुरोगामी वातावरण भगवे झाले. पण राजकारणात अशी उलटापालट नेहमीच होत असते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्हयावर महायुतीने पकड बसवली. या धक्कादायक पराभवानंतर पवार गट पुरता हादरला. त्यात राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यामुळे पक्षाची ताकद दुभंगली. मात्र सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विजयानंतर शरद पवारांचा विश्वास वाढला आहे. शनिवारी एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार सातार्यात आले असता सह्याद्री कारखान्याचे मार्गदर्शक, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तेव्हा बाळासाहेब पेढे कुठे आहेत? अशी मिश्किल टिपणी खासदार शरद पवारांनी केली.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजप सातारा जिल्ह्याचा किंगमेकर झाला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासलेला दिसून आला. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद पवारांचे विश्वासू व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा धक्कादायक पराभव करून भाजपचे मनोज घोरपडे हे पहिल्यांदाच आमदार झाले. विधानसभा निवडणुक जिंकल्यानंतर घोरपडे यांनी सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे मोर्चा वळवत आपले पॅनल उभे केले. बाळासाहेब पाटलांच्या विरोधकांचे तिसरे पॅनलही निवडणुकीत उभे होते. मात्र या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांनी चमत्कार घडवला. विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. सह्याद्रीतील हा विजय थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीसाठी बळ देणारा ठरला आहे. आपले निष्ठावंत शिलेदार अजूनही प्रयत्नशील आहेत, याचे कौतुक राजकारणातल्या त्या जाणता राजाला वाटले. शरद पवारांनी असे अनेक पराभव पाहिले आहेत, काही पचवलेही आहेत. परंतु त्यांनी दरवेळी फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून झेप घेतली आणि दरवेळी नवलाई घडवली.
सततच्या पराभवाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत झाली आहे, असे काही लोक म्हणत आहेत. परंतु ठोस विचारांवर उभे असलेले राजकीय पक्ष कधीच कमजोर होत नाहीत, असे मानणारे नेते शरद पवार आहेत. आकाशात सूरी असताना काही वेळी ढग मध्ये येतात, त्यावेळी पृथ्वीवर काळोख पसरतो. म्हणून तो काळोख कायमचा नसतो. ढग निघून गेले की सूर्य पूर्वीसारखा चमकतो, तळपतो. सूर्याचा प्रकाश काही वेळ अडवणे शक्य आहे, परंतु कायमचा कुणी अडवेल असे नाही. राजकारणातील या आशा प्रकारच्या काही गोष्टींनी पवारांही साथ सोडली. त्यामुळे अनेकजणांना वाटते की, आपणही दिसरीकडे गेलो तर आपल्याला बहार येईल, आपल्याला चांगले दिवस येतील. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या विजयामुळे पुन्हा ताकदीने उभी राहू लागली आहे. सह्याद्रीच्या याच विजयाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी शनिवारी सातारा दौर्यावर होते. सैनिक स्कूलच्या मैदानावर शरद पवारांचे हेलिकॉप्टर उतरले. या ठिकाणी सह्याद्री कारखान्याच्या पी. डी. पाटील पॅनलचे प्रमुख बाळासाहेब पाटील यांनी हेलीपॅडवर पवारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तेव्हा, ‘बाळासाहेब सह्याद्रीत मिळवलेल्या विजयाचे पेढे कुठे आहेत?’ असा मिश्किल प्रश्न पवारांनी बाळासाहेबांना केला. तेव्हा साहेब पेढे घेऊनच आलो आहे, असे बाळासाहेब हात जोडतच त्यांना म्हणाले. या स्वागत सोहळ्यावेळी पवारांसह सर्वजण हास्य विनोदात रंगले. या दोन्ही नेत्यांतील संवाद फेकीला उपस्थितांनीही हसून दाद दिली.
शरद पवारांनी सातारा येथे पावसाळ्यात एक सभा घेतली होती. त्यावेळची आठवण या निमित्ताने आता जागी झाली. त्यावेळी भाजपने सर्वत्र जोरदार प्रचार केला होता. राष्ट्रवादी पक्षाचा उएडवार निवडून येल्क ई नाही अशी शंका खुद्द पक्षातील काही जणांना होती. त्याचवेळी शरद पवारांनी जोरदार पाऊस पडत असताना डोक्यावर कार्यकर्त्यांने धरलेली छत्री बाजूला करीत सभेला संबोधित केले होते. एक लढवय्या महातारा सभेतील त्या जनसमुदायाला चेतवीत होता, लोकांना आत्मविश्वासाने, आम्ही तुमची काळजी घेऊ असे मनापासून सांगत होता. त्याच शरद पवारांनी तत्कालीन लोकसभा उमेदवाराला तेव्हाच खर्या अर्थाने निवडून आणले होते. शरद पवार हे कुठेही जावोत, ते तिथल्या कार्यकर्त्यांना थेट नावाने ओळखतात, त्यांच्याशी संवाद साधतात. त्यामुळे कराड परिसरात सह्याद्री कारखान्यावेळी घडलेली हकीकत पवारांना चांगलीच माहीत आहे. त्यामुळे पवारांनी, सह्याद्रीच्या विजयाचे पेढेच मागितले नाहीत तर भविष्यातील प्रत्येक लढाईच्या विजयाचे पेढे हवेत असेही त्यांनी नेत्यांना सूचित केले आहे, असेच वाटते.