15.4 C
New York
Saturday, May 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

12 गावच्या पोलीस हद्दीतील 12 भानगडी चर्चेत

तळबीड पोलिसांचे नक्की चाललंय काय! औद्योगिक वसाहतीला वाली कोण?

उंब्रज/अनिल कदमः-
तासवडे (ता. कराड) येथील औद्योगिक वसाहतीत कोकेन (ड्रग्ज) सारख्या भयावह अंमली पदार्थाच्या उत्पादन, तसेच विक्रीचे केंद्र झाले होते. याचा पर्दाफाश पोलीसांनी केला. मात्र, यासाठी तेलंगणा राज्यामधील तपास यंत्रणेला तासवडे एमआयडीसीपर्यंत पोहचावे लागले. आता अन्न औषध प्रशासन, तळबीड पोलीस व सातार्‍याची तपासी यंत्रणा कुठपर्यंत पोहचणार, असा सवाल निर्माण झाला आहे. तासवडे एमआयडीसीत कोकेन आले कुठून? का याची निर्मितीच सुर्यप्रभा फार्माकेम कंपनीत होते का? हा तपासाच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. यामुळे 12 गावच्या तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 12 भानगडी चर्चेत आल्या आहेत.
तासवडेत अनेक केमिकल तयार करणार्‍या कंपन्या मन मर्जीने सुरू आहेत. याच्यावर कोणाचेही नियत्रंण नाही. फार इतिहास तपासण्यापेक्षा या महिन्याभरातच परवानगी नसणारे प्लास्टिक या एमआयडीसीत तयार होत होते. त्याच्यावर कारवाई झाली. एका कंपनीत केमीकलचा बॅरल फुटून युवकाचा मृत्यू झाला. दुसर्‍या एका कंपनीच्या हलगर्जीपणाने वेल्डिंग करताना युवकाचा मृत्यू झाला. तर एका कंपनी बहाद्दराने कोट्यवधीची फसवणूक केल्याचा गुन्हा तळबीड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. अशा अनेक घटना व काळ्या धंद्यानी तासवडे एमआयडीसीला गालबोट लागत आहे.
शुक्रवारी तासवडे एमआयडीसीतील सुर्यप्रभा फार्माकेम कंपनीतील कोकेनचा पर्दाफाश झाला खरा. पंरतु, या औद्योगिक वसाहतीत त्या कंपनीत कोट्यवधी रुपये किमतीचे अमली पदार्थ बिनबोभाट बनवले जात होते. तेलंगाणा राज्यातील तपास पथके सातारा जिल्ह्यातील या एमआयडीसीत येऊन या प्रकरणाची पोलखोल करतात. पंरतु, 200 मीटर असणार्‍या तळबीड पोलीसांना याचा मागमूसही नव्हता. त्यामुळे तळबीड पोलीस नेमके काय करतात याबाबत उलटसुलट चर्चा परिसरात सुरू झाल्या आहेत. तासवडे एमआयडीसी व अवघ्या बारा गावांचा कार्यभार असताना इथल्या अवैध धंद्यांवर वचक मिळवता आलेला नाही. चार ते सहा कर्मचारी चक्क वाहतूक पोलिसांच्या पांढर्‍या कपड्यात चोवीस तास महामार्गावर असतात. औद्योगिक वसाहतीत चालणारे अवैध धंद्यांची वाहतूक या पोलिसांना माहीती असल्याची खळबळजनक चर्चा सध्या सुरू आहे.
सुर्यप्रभा फार्माकेम कंपनी सुरू झाल्यानंतर आजअखेर केलेले उत्पादन कोणाला पाठविले? या पार्ट्या नक्की कुठल्या आहेत व नेमका कसला खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात? याचीही पडताळणी गरजेची आहे. याची व्याप्ती राज्य, परराज्य, तसेच विदेशात सुद्धा असू शकते. आयात-निर्यात प्रकरणात या कंपनीचा सहभाग आहे का? याचीही खातरजमा तपासात पोलीसांना करावी लागणार आहे. तेलंगाणा राज्याचा आणि तळबीड येथील कंपनीचा नेमका संबंध काय? याबाबत पोलिसांना बारकाईने तपास करावा लागणार आहे. यासाठी गेट पास, जीएसटी बिले, वाहतूक केलेली वाहने, त्याचे जीपीएस लोकेशन यासह सखोल तपास केल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती लक्षात येणार असून वरवरचा तपास कुचकामी ठरणार आहे.
तासवडे एमआयडीसीत सापडलेले कोकेन दौंड श्रीरामपूर मार्गे तेलंगणा गोवा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यात पुरवठा होत असल्याची चर्चा सुरू असून तेलंगणा पोलिसांमुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला. वास्तविक तेलंगणा पोलिसांनी तासवडे एमआयडीसी गाठल्यानंतर स्थानिक पोलिसांना जाग आली. मात्र, अन्न औषध प्रशासन व स्थानिक पोलीस यापासून अन्नभिन्न असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. येथील कोकेनचा व्यवसाय देशात कुठपर्यंत पोहोचला आहे, याची पाळेमुळे खणून काढणे गरजेचे आहे.
या सूर्यप्रभा फार्माकेन कंपनीचा मालक अमरसिंह देशमुख (रा. नांदगाव ता. सातारा) व त्याचे साथीदार गेल्या आठ वर्षांपासून खत बनवण्याच्या नावाखाली कोकेनचे उत्पादन घेत होते, अशी चर्चा सुरू आहे. तसेच कंपनीचा मोरक्या अमरसिंह देशमुख व दौंड येथील विश्वनाथ शिपनकर या दोघांनी प्लॅनिंग करून कोकेन बनवण्याचा उद्योग सुरू केल्याचेही बोलले जात आहे. तासवडेत कोकेन बनवल्यानंतर ते दौंडला जायचे व तेथे विश्वनाथ शिपणकर हा कोकेनचे पॅकिंग करून ते तेलंगाना, तामिळनाडू, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांसह अन्य काही ठिकाणी पाठवायचा, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. परंतु, तासवडे एमआयडीसीत राजरोसपणे खते बनवण्याच्या नावाखाली कोकण तयार केले जात होते का? याचा तपास संबंधित सर्व यंत्रणांनी करणे गरजेचे आहे.

चार ते सहा वाहतूक पोलीस रस्त्यावर,पण…
तळबीड पोलीस ठाण्यात चार वाहतूक पोलीस कर्तव्यावावर असतात. परंतु, टोल नाक्यावर दंगा अथवा काही चुकीचा प्रकार घडला, तर यातील एकही बहाद्दर जागेवर हजर नसतो. मग एवढे मनुष्यबळ नेमके कशासाठी? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वाहतूक पोलिसांना परिसरात नक्की कशाची वाहतूक होत आहे, याची साधी कुणकुण लागली नाही, याचे मोठे आश्चर्य आहे. तासवडे औद्योगिक वसाहतीत आजअखेर अनेक दुर्घटना घडल्या आहेत. परंतु, याकडे कधीही पोलीस प्रशासनाने गंभीरपणे लक्ष दिले नाही. केमिकल कंपनीतील स्फोट, कामगाराचा गुदमरून मृत्यू, शॉक लागणे, प्लास्टिक कारवाई, फसवणूक याबरोबरच अनेक गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा स्थानिकांच्यात असते. परंतु, पोलिसांनी कधीही याची गंभीरपणे दखल घेतली नाही. त्यामुळे कोकेन सारखे अंमली पदार्थ या एमआयडीसीत सापडले, यात आश्चर्य वाटायला नको.

खते नव्हे,कोकेन निर्मितीसाठी आलिशान इमारत
कोकेन साठा जप्त केला, त्या इमारतीत शेतीसाठी उपयुक्त खते बनवली जाणार असल्याचे सांगितले जाते. पंरतु, सदरची इमारत अतिशय प्रशस्त असून बांधकामावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. संबधित मालकाच्या अनेक आलिशान मोटारी असून त्याची खरेदी या वर्षभरात झाल्याची माहिती स्थानिक पातळीवर उपलब्ध होत आहे. या इमारतीला झालेल्या खर्चाचा तपशील पोलिसांनी शोधला, तर उत्पनाचे मार्ग काय? याबाबतचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. तसेच संबधित व्यक्ती, त्याचे नातेवाईक, मित्र यांचे कॉल रेकॉर्ड व बँक तपशील यांमधून नक्कीच तपासाची दिशा मजबूत होणार, तसेच आणखी कोणाचा सहभाग यामध्ये आहे का? याबाबत माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच सदर कंपनी कृषी बाबतची खते तयार करीत असल्याची माहिती उपलब्ध होत असली तरी त्याला तो परवाना कधी मिळाला याबाबत संबधित शासकीय अधिकार्‍यांनी स्थळ पाहणी केली का? कंपनीचे फायर ऑडिट तसेच इतर परवानग्या मिळून अन्न व औषध प्रशासनाने काय शेरा मारला याबाबतचा तपशील पोलिसांनी उपलब्ध करून सखोल तपास करणे गरजेचे होणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या