spot_img
spot_img
spot_img
spot_img

पाटणमध्ये सोमवारी राजकीय भुकंप?

भाजप प्रवेशाबाबत निश्चिती होण्याची शक्यता..

पाटण/एस.मोहितेः-
पाटण विधानसभा मतदारसंघात सोमवारी दि.26 मे रोजी राजकीय भुकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील राजकीय वाटचालीच्या पार्श्वभूमीवर पाटणकर गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सोमवारी पाटण येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूकी पासून चर्चेत असलेला भाजप प्रवेशा बाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेवून ठोस निर्णय होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतीत अंतिम निर्णय माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, पाटण मतदार संघाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर घोषित करतील असे बोलले जात आहे..?
नुकत्याच सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सत्यजितसिंह पाटणकर यांना उमेदवारी नाकारुन शिवसेना उबाठा गटाशी युती धर्म पाळून पाटण मतदार संघाची जागा शिवसेनेला सोडली होती. तेंव्हा पासून पाटणकर गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटा बाबत कमालीची नाराजी पसरली. विधानसभा निवडणुकीत सत्यजितसिंह पाटणकर यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर अपक्ष उमेदवारी करत निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा मंत्री शंभुराज देसाई यांच्या विरोधात 35 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. राज्यात देखील निवडणूकीचे चित्र पालटले गेले. अनेक मतदारसंघात अनपेक्षित निकाल लागले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भवितव्य या निकालामुळे समोर आले. 2014, 2019 आणि 2024 अशा तीन निवडणुकीत सत्यजितसिंह पाटणकर यांचा तिसर्‍यांदा पराभव झाला. या काळात पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांना राजकीय पाठबळ कमी मिळाले गेले. अनेक कार्यकर्त्यांच्या कडून नाराजीचे सूर उमटत होते. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, सोसायटी, सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पाटणकर गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिवारी लागला. तेंव्हापासून पाटणकर गटात भाजप प्रवेशा बाबतीत चर्चेला उधाण आले. मात्र भाजप प्रवेशाची निश्चिती जवळ येत नव्हती.
पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या निवडणूका सप्टेंबर- ऑक्टोंबर अखेर घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री शंभुराज देसाई गटाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. काही करून पाटणकर गटाला या निवडणुकीत धोबीपछाड करण्याचा चंग देसाई गटाने बांधला आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अवस्था पाहता आणि पाटण मतदार संघात पाटणकर गटाला कोणत्याही राजकीय पक्षाचे पाठबळ नसल्याने विजयाची पताका आपल्याच हातात असल्याचा विश्वास देसाई गटाकडे आहे. या सर्व राजकीय वातावरणाचा विचार करून आणि पाटण मतदार संघात पाटणकर गटाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी पाटणकर गटाला सत्तेतील पक्षाची आवश्यकता आहे. यावर कार्यकर्त्यांचे झालेले ठाम मत आणि भाजप प्रवेशा बाबत कार्यकर्त्यांचा वाढत असलेला दबाव पहाता सोमवारी दि.- 26 मे ला पाटणकर गटाने कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, पाटण मतदार संघाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर हे कार्यकर्त्यांची मते जाणून घेवून ठोस निर्णय घेतील असे बोलले जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या