कराड/प्रतिनिधी : –
कराड पालिकेच्या पदावरून कार्यमुक्त होऊनही बिल्डरकडे १० लाखाची लाच मागून मागील तारखेच्या चलनावर स्वाक्षऱ्या करणारे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना अटक झाली आहे. सोमवार पेठेतील एका अपार्टमेंटच्या बांधकाम परवानगीसाठी लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सकाळी सातारा येथे कारवाई केली आहे.
येथील फौजदारी न्यायालयाने २८ जुलै अखेर त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. मुख्याधिकारी खंदारेसह चौघांवर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल होता. यातील तीन जणांना यापूर्वीच अटक झाली आहे. खंदारेंनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने नऊ मे रोजी तो फेटाळला. त्यानंतरही दोन महिन्यांनी सकाळी त्यांना अटक झाली.
याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे बांधकाम व्यावसायिकांनी २४ मार्च रोजी तक्रार दिली होती. त्यांचे शहरातील सिटी सर्वे क्रमांक 79 येथे पार्किंग आणि पाच मजली इमारतीचे काम प्रस्तावित आहे. त्याला बांधकाम परवानगी मिळण्यासाठी २०१२७ मध्ये त्यांनी प्रकरण दिले होते. त्या कामाची मुदतवाढ दोन जानेवारी २०१९ पर्यंत घेतली होती. काम सुरू न झाल्याने पुन्हा २०१२१ मध्ये सुधारित परवानगी मिळाली. त्या काळात अनेक नियमावलीत बदल झाल्याने सुधारित बांधकाम परवानगी परवाना मिळण्यासाठी त्यांनी पुन्हा २०२३ मध्ये अर्ज दाखल केला. संबंधित परवानगीसाठी तक्रारदार यांनी सहायक नगर रचनाकार स्वानंद शिरगुप्पे यांच्याकडे पाठपुरावा करत होते. शिरगुप्पे यांनी खासगी व्यक्ती अजिंक्य देव समवेत तक्रारदारास समक्ष भेटले. त्यांनी परवानगीच्या बांधकामांमध्ये दोन हजार स्क्वेअर फुट वाढीव एफएसआयचे आहे, त्या मिळकतची बाजारभावाप्रमाणे मिळकतीच्या ८० लाखांपैकी १२ टक्के रक्कम म्हणजे दहा लाख रुपयांचा मागमी केली. ती मागणी पंचांसमक्ष झाली होती. यामध्ये पालिकेचे बदली झालेले तत्कालीन मुख्याधिकारी खंदारे, सहायक नगररचनाकार शिरगुप्पे, पालिकेचा कर्मचारी तौफिक शेख व खासगी व्यक्ती देव यांनी संगनमताने लाचेच्या मागणी केलेल्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये द्या, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे यातील संशयित लोकसेवक मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त झाला होता. कार्यमुक्त होऊन देखील खंदारे यांनी तक्रारदारांची सुधारित बांधकाम परवाना परवानगी देव यांच्याकडून प्राप्त झालेल्या फाईलवर सहायक नगररचनाकार शिरगुप्पे आणि तौफिक शेखच्या मदतीने बांधकाम परवानासाठी आवश्यक चलन व्हाट्सअप वरून स्वतःच्या मोबाईलवर घेतले. मागील तारखेच्या चलनावर सह्या केल्या. पुन्हा शिरगुप्पे यांच्या मोबाईल क्रमांकावर ते पाठवले व लाच घेण्यास पोषक वातावरण तयार केले.
याप्रकरणी तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्याने तक्रार दाखल केली. त्यानुसार सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, श्रीधर भोसले, पोलीस हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजपुरे, प्रशांत नलावडे, विक्रमसिंह कणसे यांनी २४ मार्च रोजी येथे सापळा लावून दहा लाखापैकी पाच लाखाचा पहिला हप्ता स्वीकारताना तौफिक शेखला रंगेहात पकडले. त्याप्ररकरणात खंदारे, सहायक नगररचनाकार शिरगुप्पे, देव यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यातील तिघांना यापूर्वीच अटक झाली होती. खंदारे अटक नव्हते. त्यांनी न्यायालयात अटकपूर्वसाठी अर्ज केला होता. त्यावर पाच महिने सुनावणी सुरू होती. ९ मे रोजी त्यांचा शेवटचा उच्च न्यायालयातील अटकपूर्व अर्ज फेटाळला. त्यानंतरही दोन महिन्यांनी आज सकाळी त्यांना अटक झाली. येथील फौजदारी न्यायाधिश डी. बी. पतंगे यांच्यासमोर त्यांनी हजर केले. सराकर पक्षातर्फे अॅड. आर. सी. शाह यांनी सरकारची बाजू मांडली. उपाधीक्षक श्री. वाघमारे यांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी मागवली होती. मात्र, २८ जुलैपर्यंत कोठडी दिली आहे.