उपोषणकर्ते गणेश पवार यांचा आरोप; संबंधितांवर गुन्हे दाखल करा, चौकशी करून निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
कराड/प्रतिनिधी : –
विधानसभा निवडणुकीदरम्यान तालुक्यातील कापिल व गोळेश्वर येथे बोगस मतदान झाले असल्याचा आरोप उपोषणकर्ते गणेश पवार यांनी केला आहे. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणतीही चौकशी न करता बोगस मतदारांना पाठीशी घातले असून, दिलेले पुरावे तपासण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका श्री. पवार यांनी त्यांच्यावर ठेवला आहे. तसेच बोगस मतदारांवर गुन्हे दाखल करावेत आणि दोशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई व्हावी, अशीही मागणी श्री. पवार यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कार्यालयासमोर गणेश पवार यांनी १४ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले असून, सोमवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता. तरीदेखील अद्याप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भेट देऊन चर्चा न केल्यामुळे नाराजी व्यक्त करत श्री. पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर संपूर्ण प्रकरणाचे पुरावे सादर केले.
मागे हटणार नाही :
पाच दिवसांपासून उपोषण सुरू असूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यांनी कोणाच्या दबावाखाली हे काम केले आहे का? तसे नसेल तर, ते ठोस पुरावे का सादर करत नाहीत? असे सवाल उपस्थित करून आंदोलनस्थळी न येता ते चर्चेला आपणास त्यांच्या कार्यालयात बोलावून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय व्यक्त करून “जीव गेला तरी चालेल, पण मागे हटणार नाही,” अशा शब्दांत आपल्या आंदोलनाची भूमिका गणेश पवार यांनी स्पष्ट केली.
लोकशाहीसाठी घातक बाब :
नुकताच देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र देशात मतदान प्रक्रियाच सदोष असल्याची गंभीर परिस्थिती निदर्शनास आली असून, या संदर्भात सामान्य नागरिकाने उपोषण केल्यास प्रशासनाकडून साधी दखलही घेतली जात नाही. ही लोकशाहीसाठी घातक बाब असल्याचे मत नितीन ढापरे यांनी व्यक्त केले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी वाचा उद्याचा दैनिक प्रीतिसंगम…