कराड/प्रतिनिधी : –
कराड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठीची सोडत आज बुधवार, दि. ८ सकाळी ११ वाजता येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सोडतीत अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), तसेच सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी नुकतेच खुल्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याने या पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी सुरू झाली आहे. अनेकांनी आतापासूनच आपापली दावेदारी जाहीर केली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आता सदस्यपदांच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विविध प्रभागांमध्ये कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण निघते, कोणत्या महिला आरक्षित जागा ठरतात आणि कोणाला संधी मिळते, याकडे सर्वच पक्ष, संभाव्य उमेदवार आणि नागरिक उत्सुकतेने पाहत आहेत. या सोडतीनंतर कराड नगरपालिका निवडणुकीच्या राजकीय समीकरणांची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.