मनोहर भाऊंची अस्वस्थताःकाँग्रेसमध्ये ना मान,भाजपमध्येही मिळेना सन्मान
कराड/राजेंद्र मोहिते:-
मलकापूरसारख्या काँग्रेसच्या पारंपारिक गडावर दोन पिढ्यांची सरदारकी गाजवलेल्या शिंदे घराण्याची सध्या राजकीय अवस्था एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात अशी झाल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसची धुरा सांभाळणारे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हे सध्या दोन्ही पक्षांत अडकल्याची स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसमध्ये मान मिळेना, तर भाजपकडून सन्मान मिळेना, अशा परिस्थितीमुळे त्यांची राजकीय वाटचाल संभ्रमात अडकली आहे.
काँग्रेस नेत्या माजी खासदार दिवंगत प्रेमिलाकाकी चव्हाण यांच्या काळात काँग्रेसशी एकनिष्ठ राहून जनतेचा विश्वास संपादन करणारे माजी आमदार स्व.भास्करराव शिंदे यांना काँग्रेसने आमदारकी दिली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोहर शिंदेंनीही काँग्रेसच्या माध्यमातून मलकापुरात आपली छाप उमटवत अनेक विकासकामे केली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या पाठिंब्यामुळे शिंदेंचा दबदबा प्रचंड होता. त्यांनी दोन कार्यकाळ मलकापूरचे उपनगराध्यक्षपद भूषवले. एकूणच मलकापूर ग्रामपंचायत, नगरपंचायत ते नगरपालिका या प्रवासात शिंदे कुटुंबाने आपले वर्चस्व कायम टिकविले. तब्बल 15 वर्षामध्ये 11 नगराध्यक्ष झाले मात्र एकच उपनगराध्यक्ष राहिला, हा ही बहुमान मनोहर शिंदेंनाच मिळाला. तरीही शिंदे अस्वतच..!
मात्र, राजकीय समीकरणे बदलली आणि काँग्रेस संक्रमण काळातून जात असताना अनेक नेत्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला. कराड दक्षिण मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवानंतर स्थानिक नेते विद्यमान आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये दाखल झाले. त्याच धर्तीवर मनोहर शिंदे यांनीही आपली ‘मलकापुरची सरदारकी’ अबाधित ठेवण्यासाठी भाजप प्रवेशाची दारे ठोठावली. यासाठी त्यांनी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली. मात्र, भाजपच्या स्थानिक गोटातून त्यांच्या प्रवेशाला विरोध होत असल्याने अद्याप त्यांना हिरवा कंदील मिळालेला नाही.
दरम्यान, काँग्रेसच्या हालचालींवरून नाराज झालेल्या शिंदेंना कराड दक्षिण अध्यक्षपदावरून पदमुक्त करण्यात आले. तरीही त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश न केल्याने काँग्रेसच्या शुभेच्छा फलकांवर आजही त्यांचा चेहरा झळकतो. नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या फराळ समारंभातही ते दिसले, पण ती उपस्थिती ‘औपचारिक’ असल्याचेच मानले जात आहे. त्यामुळे आता ना काँग्रेसमध्ये मान, ना भाजपमध्ये सन्मान, अशी त्यांची केविलवाणी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे.
आरक्षण बदलले,पण मूळ पद तरी द्या!
मलकापूर नगरपालिकेच्या स्थापनेपासून शिंदे कुटुंबीयांनी सत्ता आणि प्रभाव टिकवला. नगरपंचायत आणि आता नगरपालिकेत नगराध्यक्षपदाची गादी मिळावी, ही मनोहर शिंदेंची दीर्घकालीन इच्छा मात्र आरक्षणाच्या खेळीत प्रत्येक वेळी अपुरी ठरली. गत निवडणुकीत खुले आरक्षण न मिळाल्याने त्यांना उपनगराध्यक्षपदावर समाधान मानावे लागले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात उभारलेली पालिकेची भव्य इमारत ‘आपल्या अध्यक्षतेत कार्यान्वित व्हावी’ अशी त्यांची स्वप्ने होती. पण पुन्हा आरक्षणाचा फटका बसल्याने ते पारंपारिक उपनगराध्यक्षपदाची मागणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांचा भाजप प्रवेश ‘त्या पदासाठीचा राजकीय शॉर्टकट’ असल्याचे मत मलकापूरच्या राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.





