spot_img
spot_img
spot_img
spot_img

विटा शहरात अग्नीतांडव ! भीषण स्फोटात जोशी कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

विटा शहरात अग्नीतांडव ! भीषण स्फोटात जोशी कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

गॅस गळती किंवा रेफ्रिजरेटरमधील दूषित गॅसमुळे दुर्घटना घडल्याची शक्यता; विटा शहरात हळहळ

विटा/ शिराज शिकलगार

विट्यातील जुना वासुन्बे रस्त्याला असलेल्या जय हनुमान स्टील या भांडी व फर्निचर दुकानाला अचानक लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांसह एक पुरूष व दोन वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. विष्णू पांडूरंग जोशी (वय ५०), त्यांची पत्नी सुनंदा जोशी (वय ४५), त्यांची विवाहित मुलगी प्रियांका इंगळे (वय २८) व नात सृष्टी इंगळे (वय ३, सर्व रा. सावरकरनगर, विटा) अशी या दुर्घटनेत ठार झालेल्या चौघांची नावे आहेत. विष्णू यांची दोन मुले मनीष (वय २५) व सूरज (वय २२) हे गॅलरीतून तातडीने बाहेर पडल्याने बचावले. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शहरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विटा येथील सावरकरनगरमध्ये विष्णू जोशी यांचे जय हनुमान स्टील सेंटर हे भांडी व फर्निचरचे मोठे दुकान आहे. या दुकानात खालील भागात भांडी, पहिल्या मजल्यावर लाकडी फर्निचर, गादीचे साहित्य व त्यावरील मजल्यावर जोशी कुटुंब राहते. य दुकानात आतील बाजूस जिना असून या जिन्यातून हे कुटुंब वरील दोन्ही मजल्यावर ये-जा करत होते. सोमवारी सकाळीच्या सुमारास दुकानाच्या आतील बाजूस अचानक आग लागली. त्यावेळी दुकानाचे दोन्ही शटर आतून बंद होते. तर जोशी कुटुंबातील सहा सदस्य वरील मजल्यावर होते. ही आग सर्वत्र पसरली. त्यावेळी रस्त्याने ये-जा करणार्‍या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा झाले. परंतु , भांड्याच्या दुकानात आग लागल्याने जोशी कुटुंबातील लोकांना जिन्यावरून बाहेर पडता आले नाही.

आगीतून जोशी कुटुंबियांना वाचवणार्‍या काही तरूणांनी शेजारच्या इमारतीच्या टेरेसवरून आतील गॅलरीमधून मनीष (वय २५) व सूरज (वय २२) या दोघांना बाहेर घेतले. मात्र, विष्णू, त्यांची पत्नी सुनंदा, मुलगी प्रियांका इंगळे व तीन वर्षाची सृष्टी इंगळे यांना दुर्दैवाने आगीतून बाहेर पडता आले नाही. दुर्दैवी बाब अशी की, मृत्यूमध्ये गरोदर महिलेचाही समावेश होता. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण करून इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर प्रवेश केला होता. तरूणांनी भिंतीला भगदाड पाडून आतून लोकांना बाहेर घेण्याचा प्रयत्न केला.

या भीषण आगीत विष्णू, सुनंदा, प्रियांका व सृष्टी या चिमुकलीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या आगीत सुरज विष्णु जोशी जखमी झाला आहे. नातेवाईक कमलाकांत सिद्धराम भोसले रा. तासगाव हेही जखमी झाले आहे. या घटनेनंतर विटा, कडेगाव, पलूस, तासगाव, कुंडल येथील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पाच तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली गेली. शेकडो तरूण आगीतून जोशी कुटुंबियांना वाचवण्यासाठी सरसावले होते. आ. सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी घटनास्थळी थांबून घरात अडकलेल्या जोशी कुटुंबियाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक नागरीक, तरूण आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या परिश्रमातून ही आग आटोक्यात आली. या घटनेने विटा शहर हादरले असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सदर घटनेची माहिती समजताच सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदिप घुगे सह पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. खासदार विशाल पाटील, पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली. सामाजिक कार्यकर्ते, विटेकर नागरिक व पोलीस मित्र शिराज शिकलगार यांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचा हात दिला. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या