मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, हवामान विभागानं (IMD)दिलेल्या माहितीनुसार मान्सूननं कोकण आणि मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्हे व्यापले आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी विदर्भात देखील धडक दिली आहे.
मान्सूनचं मंगळवारी पश्चिम विदर्भात आगमन झालं. मान्सूनचं आगमन होताच विदर्भात पावसानं दमदार हजेरी लावली. मात्र दुसरीकडे पूर्व विदर्भात अद्यापही मान्सूनचं आगमन झालेलं नाहीये, बाष्पयुक्त हवेमुळे पुन्हा एकदा पूर्व विदर्भात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान या काळात नुसता पाऊसच पडणार नसून वादळाचा इशारा देखील देण्यात आला आहे, महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी राहू शकतो असं हवामान विभागनं म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.