सातारा:
सातारा पोलीस दलाच्या वतीने बुधवार दिनांक १९ जून पासून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पण काल दुपारी तीन वाजल्यापासून कोसळणाऱ्या पावसामुळे पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी देताना अनेक उमेदवारांच्या पावलाची गती मंदावली आहे. या परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी उमेदवारांकडून होऊ लागलेली आहे.
पाऊले चालली पंढरीची वाट या उक्तीप्रमाणे आषाढी एकादशी पूर्वीच वारकरी सज्ज झाले असतानाच सातारा पोलीस दलातही भरती होण्यासाठी पाऊले चालली कवायत मैदानावर चाचणीची वाट.. असे त्याचे वर्णन होऊ लागलेले आहे. पण, पावसामुळे यामध्ये व्यत्य आलेले आहे.
सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पहिल्या दिवशी एक हजार उमेदवारांचे वजन, उंची हे शारीरिक मोजमाप व इतर मैदानी चाचणी घेण्यास सुरुवात झाली होती. बायोमेट्रिकचा वापर करून ही प्रक्रिया राबवण्यात येत असतानाच अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे उमेदवारांच्या धावण्याची गती अक्षरशः मंदावलेली आहे.पोलीस कवायत मैदानावर अनेक ठिकाणी पाणी व चिखलमातीचे थर साचल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातून आलेल्या उमेदवारांना धावताना अनेक अडचणी येत होत्या. पोलीस शिपाई बँड वादक या पदासाठी २३५ जागांसाठी तेरा हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या पदासाठी सकाळी पाच वाजल्यापासून सातारा पोलीस कवायत मैदानावर युवक व तरुण सर्व कागदपत्र व शारीरिक चाचणीसाठी जय्यत तयारी करत आहेत.
काल कोसळणाऱ्या पावसामुळे उच्च पदवीधर त्याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करणारे युवक व तरुण सुद्धा या पोलीस भरती मध्ये सहभागी झाले होते. पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे ही हुशार विद्यार्थी आणि उमेदवारसुद्धा नोकरीची खात्री म्हणून भरती साठी आले होते. त्याचबरोबर अभियंता व इतर गोष्टींचे पदविका घेऊन आयुष्यभर आता पोलीस दलात बँड वाजवण्यासाठी वादक म्हणून तयार झाले आहेत. उमेदवाराची पात्रता पाहून गुणवत्तेनुसार त्यांना पुन्हा लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ही प्रक्रिया छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिली म्हणजे दिनांक २६ जून पासून सुरू होणार आहे.
सातारा जिल्हा पोलीस दलाच्या कवायत मैदानावर काल कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक उमेदवार चिंताग्रस्त झाले होते. भरती प्रक्रिया पूर्वी अनेकांनी जय्यत तयारी करताना उघड्या मैदानावर व डोंगर माथा, रस्त्यावर तयारी केली होती. पण चिखल व पाणी साचलेल्या मैदान व रस्त्यावर कुणीच तयारी केली नसल्यामुळे त्यांना परीक्षा देताना त्यांच्या पायाची गती मंदावली होती. याचा विचार करून पोलीस दलातील ही भरती प्रक्रिया वातावरण पाहून पुन्हा घ्यावी. अशी मागणी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते श्री दत्ता केंगार, विकास भिलारे, रविंद्र जगताप व साताऱ्यातील ऍड .विकास पवार यांनी केलेली आहे.सातारा पोलीस कवायत मैदानावर काल दुपारी तीन वाजेपर्यंत ७२० भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची वजन, उंची मोजमाप व वैद्यकीय प्राथमिक चाचणी घेण्यात आली. अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे चाचणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवार व त्यांचे नातेवाईक यांना भिजतच उभे राहावे लागले. यामुळे अनेक जण गारठून गेले होते. काही उमेदवारांची गोळा फेक,१०० मीटर व सोळाशे मीटर धावणे. असे मैदानी प्रकार झाले. उर्वरित उमेदवारांना मैदानाची परिस्थिती पाहून त्यांची चाचणी घ्यावी. कारण, पोलीस कवायत मैदानावर सर्वत्र चिखल व पाणी साचल्यामुळे भरती प्रक्रियेसाठी पारदर्शक पणाने काम करणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना सुद्धा त्याचा त्रास होऊ लागलेला आहे.
गेली वर्षभर पहाटे लवकर उठून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक युवकांना निसर्गानेच साथ द्यावी. यासाठी प्रार्थना केली जात आहे. अनेकांच्या कागदपत्रे तसेच कपडे व सोबत आलेले बूट पावसामुळे भिजल्याने त्यांना चाचणी देताना अडचणी येत आहेत. याची वरिष्ठांनी जाणीव ठेवून भरती प्रक्रिया थांबवावी व वातावरणातील बदल लक्षात घेऊन सोयीनुसार बदली प्रक्रिया राबवली तर खऱ्या अर्थाने गुणवत्तेला वाव मिळेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. दरम्यान ,निवडणूक प्रचारासाठी युवक व तरुणांचा वापर केला जातो. तर दुसऱ्या बाजूला साताऱ्यात या भरती प्रक्रियेच्या उमेदवारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता अथवा लोकप्रतिनिधी उपस्थित राहू शकला नाही. याचा आता युवक व तरुण विचार करू लागलेले आहेत.