पुणे :
लोकसभेला मिळालेल्या दणदणीत यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा महाविकास आघाडीने एकत्रित लढण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या संदर्भात कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी जागावाटपावर भाष्य केलं आहे.
सतेज पाटील यांनी सांगितले की, विधानपरिषद निवडणूक होणार नाही होणार म्हणत जाहीर झाली आहे. काँग्रेसची बैठक 25 जून रोजी प्राथमिक बैठक राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल राव यांच्या उपस्थितीत बोलावण्यात आली आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य जागावाटपावर अजून कोणतीही बैठक झाली नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
त्यांनी सांगितले की, जागा वाटपाचा माध्यमांतून सांगितला जात आहे. मात्र, त्या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत. त्यामुळे आमच्यामध्ये कोणी किती भांडण लावण्याचा प्रयत्न केला, तरी तसं काही होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्या पक्षाचा उमेदवार दिला जाईल. महाविकास आघाडीचे सरकार राज्यामध्ये स्थापन झालं पाहिजे, अशी लोकांची इच्छा असल्याचे ते म्हणाले.
दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. आता कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीशिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. याबाबत विचारले असता पाटील यांनी महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे सांगितले. जागा वाटपापासून हे सगळं लक्षात आलं असल्याचं ते म्हणाले.
वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील बैठकीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, बैठक नेहमी प्रमाणे होती आणि साखरेच्या दरासंदर्भात चर्चा झाली. साखर कारखान्यांशी संबंधित चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र, या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. याबाबत त्यांना विचारण्यात आले असता पाटील यांनी आमदार अपात्र झाले तर विधानपरिषद निकालावर परिणाम होईल म्हणून ठाकरे गटाने केलेली मागणी योग्य असल्याचे सांगितले.