जितेंद्र जाधव
इंदापूर/ प्रतिनिधी:-
राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपल्या आहेत. त्यातच इंदापूर मध्ये भाजप कार्यकर्ते कामाला लागले असून काही कार्यकर्त्यांनी विमान या चिन्हाचा बॅनर लावला असून त्या बॅनर वरती “विधानसभा २०२४ लागा कामाला’ असे स्पष्ट लिहिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा विमान विधानसभेच्या मैदानात दिसणार असे वाटू लागले आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये युवा कार्यकर्त्यांनी विमान या चिन्हाचा बॅनर लावला आहे. या कार्यकर्त्यांनी बॅनर लावून विधानसभा २०२४ लागा कामाला असे सुतोवाच केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विमान हे चर्चेत राहणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
कारण या अगोदर इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विमान या चिन्हाने आपली ताकद संपूर्ण राज्याला दाखवून दिली आहे. या चिन्हावर राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे विजयी झाले होते. ते विजय झाल्यानंतर राज्याच्या विधिमंडळात आमदारकी अगोदर मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर या विमानामुळे त्यांच्यासोबत त्याकाळी जवळपास डझनभर अपक्ष आमदार सोबत होते. त्यावेळी ते ज्यांच्या पाठीमागे उभे राहिले त्यांचीच राज्यात सत्ता आली होती इतिहास सर्वश्रुत आहे.
तसेच इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आजही विमानाला मानणारा मोठा वर्ग आहे. त्या सर्व लोकांच्या मते जर इंदापूर तालुक्याला गत वैभव मिळवून द्यायचे असेल तर विमानाशिवाय पर्याय नाही आणि विमान च इंदापूर तालुक्याला गतवैभव मिळवून देऊ शकते. त्यामुळे यंदा इंदापूरचे विमान नक्कीच हवेत भरारी घेणार असे असे सध्यातरी दिसत आहे.