जयंत पाटलांना धक्का, मिलिंद नार्वेकरांनी मारली बाजी!
मुंबई :
राज्यात शुक्रवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. या विधान परिषदेच्या निवडणुकीत ११ जागांसाठी तब्बल १२ उमेदवार रिंगणात उतरले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने झाले. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूने आमचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा केला जात होता. त्यामुळे नेमका कोणाचा उमेदवार पराभूत होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, या निवडणुकीच्या निकालात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीतील मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. तर शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे.
माझी 12 मतं मला मिळाली असून काँग्रेसची काही मतं फुटली असल्याचं शेकापचे जयंत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीच्या एकूण मतांपैकी 5 मतं फुटली आहेत. महाविकास आघाडीकडे एकूण 64 मतं होती. त्यापैकी प्रज्ञा सातव यांना 25, मिलिंद नार्वेकर यांना 22 आणि जयंत पाटील यांना 12 मतं मिळाली.