पाटण एसटी स्टँड परिसरात ओढ्याचे पाणी घुसले
पाटण:-
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात शनिवारी रात्री पासून ते रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. शनिवारी सायंकाळी पाच ते रविवारी सायंकाळी पाच या २४ तासात कोयना धरणात ३ टिएमसी पाण्याची आवक झाली. रविवारी दिवसभरात कोयना येथे १२२ मि.मी, नवजा येथे १८५ मि.मी. पाऊसाची नोंद झाली आहे. पुढील २४ तासात सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
पाटण शहरात देखील रविवारी दिवसभर पाऊसाचा जोर होता. नवीन एस.टी. स्टॅण्ड परिसरात ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे ओढ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले होते. रस्त्याकडेला असणाऱ्या दुकानात, टपऱ्यांमधे पाणी शिरले होते. नवीन एस.टी.स्टॅण्ड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे नागरिकांची दयनीय अवस्था झाली होती.
पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात देखील हा पाऊस चांगलाच झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यामुळे भात लावणी ला वेग आला असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. ओढे, नाले, नद्या तुडुंब भरून वाहत असून वाहत्या पाण्यात कोणी उतरु नये असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी दिवसभरात कोयना येथे १२२ मि.मी तर एकूण- १९१७ मि.मी, नवजा- १८५ मि.मी. एकूण- २२१० मि.मी. महाबळेश्वर- ५२ मि.मी. एकूण- १७०५ मि.मी. पाऊसाची नोंद झाली आहे. यामुळे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कोयना धरणात ३८.२८ टिएमसी पाणी साठा झाला आहे. तर प्रती सेकंद ६४,०५८ क्यूसेक्स पाण्याची आवक होत आहे.