जिल्हाधिकारी आज प्रत्यक्ष करणार पाहणी
कराड :
कराडच्या पाणी प्रश्नाबाबत निर्माण झालेल्या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या मिटिंग मध्ये मुद्दा उपस्थित करीत कराडकरांच्या भावना व्यक्त केल्या. तसेच याबाबत कराड मध्ये आढावा मिटिंग व प्रत्यक्ष पाहणी करून काही पर्याय सुचविले असल्याचेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मिटिंग मध्ये नमूद केले. तसेच हायवेच्या कामाच्या अपघातामुळे पाण्याचा जो गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, याबाबत तातडीने उपाययोजना शासनाने कराव्यात अशी सूचना करताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने पृथ्वीराज बाबांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांनी कामाची व परिस्थिती ची प्रत्यक्ष पाहणी करण्याबाबत सूचना केल्या.
तसेच कराडचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी 5 सूचना केल्या.
1. सद्य परिस्थितीत कराड शहराला तात्काळ टँकरने पाण्याची व्यवस्था करणे व ती संख्या वाढविणे व त्याचे वॉर्ड निहाय नियोजन करणे.
2. जुनी पाणीपुरवठा योजना तात्काळ चालू करणे.
3. जी पाईप तुटली आहे तिथे नवीन पाईप बसवून कोयना पुलावरून पाण्याची पाईप लाईन पुलाचे काम हायवे ऑथॉरिटी कडून होईपर्यंत सुरु करणे.
4. कराड शहरातील शुक्रवार पेठेतील जुने वाॅटर हाउस पुन्हा चालू करणे
5. कराड, मलकापूर, वारुंजी, उंडाळे या चारही पाण्याच्या योजना इंटरलिंक करणे, जेणेकरून भविष्यात पाणी प्रश्नाबाबत अडचण निर्माण होणार नाही.
या पाच सूचनांमध्ये सद्या तात्काळ सुरु करण्यासारख्या पहिल्या तीन सूचना आहेत. तसेच जो तिसरा पर्याय सुचविला आहे की, जी पाईप तुटली आहे तिथे नवीन पाईप जोडून कोयना नदी पुलावरून पाण्याची पाईप काही महिन्यासाठी सुरु करणे. जेणेकरून हायवेचे काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था होऊ शकेल. पण यासाठीचा जो खर्च आहे तो राज्य शासनाने केल्यास पुलावरून पाईपलाईनचे काम तात्काळ होऊ शकेल. अशी सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी करताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतचा खर्च राज्य शासन करेल असे जाहीर केले.