मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत काय झालं ते आपण सर्वांनी पाहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सर्वांनीच ठेवला पाहिजे, ज्यांनी महाराजांचा अपमान केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केली. महाविकास आघाडीने आज (1 सप्टेंबर) मुंबईमध्ये हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावर पायी विराट मोर्चा काढत जोडे मारो आंदोलन केले. या आंदोलनाला परवानगी नसतानाही महाविकास आघाडीने पर्वा न करता जोरदार आंदोलन केले. पायी मोर्चाचे रुपांतर गेटवे ऑफ इंडिया समोर जाहीर सभेत झाले. जाहीर सभेमध्ये बोलताना शाहू महाराज यांनी झालेल्या घटनेवर सडकून टीका केली.
महाराष्ट्र, भारत नव्हे तर भारताबाहेर देखील लोक संतप्त
शाहू महाराज म्हणाले की, मालवणमध्ये जे काही झालं ते आपण सर्वांनी पाहिलं आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र, भारत नव्हे तर भारताबाहेर देखील लोक संतप्त झाले आहेत. अशा पद्धतीने महाराजांचा पुतळा बसवणे हा महाराजांचा अपमान आहे. त्यामुळे जे घडलं आहे त्याला मोकळं सोडलं जाणार नाही. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप असल्याने दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शाहू महाराजांनी यावेळी केली. महाराजांचा मान चांगल्या पद्धतीनेच ठेवला पाहिजे. त्या पद्धतीनेच पावलं उचलली गेली पाहिजेत. ज्यानी पुतळ्याचा कार्यक्रम करून घेतला, त्यांचा निषेध केला पाहिजे असेही शाहू महाराज यावेळी म्हणाले.