धरणातून पुन्हा विसर्ग सुरु
पाटण:-
कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात पुन्हा पावसाने मुसंडी मारली असताना मुसळधार होत असलेल्या पावसाने धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. धरणातील पाणी साठा १००.३८ टिएमसी झाला आहे. पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण व्यवस्थापनाने काल मंगळवारी पुन्हा सायंकाळी ४ वा. धरणाचे वरील सहा वक्र दरवाजे दिड फुटाने उघडून नदीपात्रात १० हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नदीपात्रात वरील वक्र दरवाजातून १० हजार क्युसेक्स तर पायथा विजगृहातून २१०० क्युसेक्स असे १२ हजार १०० क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
पावसाचा जोर लक्षात घेता धरणात पाण्याची आवक वाढत आहे. पुढील काळात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढते राहिल्यास परिस्थिती नुसार धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल असे धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे. कोयना नदीला पुन्हा पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असुन नदी काठावरील सांगली, कराड, पाटण शहरासह आदी गावांनी तसेच नागरिकांनी सावधानता बाळगावी. व सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सायंकाळी ५ ते मंगळवारी सायंकाळी ५ या २४ तासात झालेल्या पावसामध्ये कोयना येथे १७२ मि.मी. नवजा येथे १९४ मि.मी. महाबळेश्वर येथे २१७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढून मंगळवारी सायंकाळ ५ वा. पर्यंत १००.३८ टिएमसी पर्यंत आली आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरण्यास केवळ साडेचार टिएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पुढील काळात संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. नदी काठावरील सांगली, कराड, पाटण शहरासह आदी गावांनी तसेच नागरिकांनी सावधानता बाळगावी. व सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.