7.3 C
New York
Friday, October 11, 2024

Buy now

spot_img
spot_img

कराड उत्तरेत डोळे उघडले पण कोणाचे..?

नेत्यांची भिरकीट कार्यक्रमांची गर्दी साहित्याचे वाटप जोमात

उंब्रज/अनिल कदमः-

कराड उत्तरेतील जनता सध्या विलक्षण अडचणीत सापडल्याची भावना त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवू लागली आहे.मसूर,उंब्रज,नागठाणे, रहिमतपूर, पुसेसावळी अशी मोठी गावे या मतदारसंघात समाविष्ट आहेत.भाजपची नेतेमंडळी विकासकामांचा डांगोरा पीटत आहेत तर विद्यमान लोकप्रतिनिधी केलेल्या कामांची जंत्रीच वाचून दाखवत आहेत यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे त्यांनी पंचवीस वर्षात काहीच केलं नाही हे खरं असेल तर यांनी तरी दहा वर्षात काय घंटा केला का ? अशा पारावरच्या गप्पा गावागावात रंगू लागल्या आहेत भाजपमधील बहुतांश पदाधिकारी पूर्वाश्रमीचे काँग्रेस विचारसरणीचेच असल्याने त्यांनाही या बाबीची जबाबदारी घ्यावीच लागणार असल्याबाबत जनतेत एकमत दिसून येत आहे यासाठी काही गावात तर ’त्यो बी नको ह्यो बी नको’सामान्य माणसालाच उमेदवारी मिळायला पाहिजे असाही सूर आळवू लागला आहे.यामुळे कराड उत्तरेत डोळे उघडले पण कोणाचे…! असे म्हणायची वेळ मतदारांवर आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी धैर्यशील कदम,मनोज घोरपडे,रामकृष्ण वेताळ यांनी उत्तरेतील गावागावात कार्यकर्ते फुलवायला आणि रुजवायला बर्‍याच काळापासून सुरुवात केली आहे.आ.बाळासाहेब पाटील यांच्यावर असलेल्या नाराजीतून युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जोडले जात असल्याचा मोठा गवगवा झाला आहे.याचे आत्मपरीक्षण विद्यमान आमदारांनी केले आहे की नाही याबाबत राजकीय निरीक्षकांच्यात मोठा खल सध्या सुरू आहे मतदारांना गृहीत धरणे महाविकास आघाडी अथवा महायुतीला महागात पडू शकते अशीच चर्चा सध्या सुरू आहे.
मसूर उंब्रज पाल गट निर्णायक
विद्यमान आमदारांचे हुकमी मतदान असणार्‍या पाल,उंब्रज आणि मसूर जिल्हापरिषद गटात सध्या भारतीय जनता पार्टीच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत याउलट आमदार गटाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेतेमंडळी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याने वरकरणी दिसणारी शांतता अंतर्गत बर्‍याच घडामोडी पार पाडणार्‍या असल्याची माहिती काही कार्यकर्ते खाजगीत कुजबुजत आहेत.सर्वच नेतेमंडळी एकमेकांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवत असून ’रात्र वैर्‍याची आहे’अशीच काहीशी सूचक विधाने चर्चेत येऊ लागली आहेत.
नवीनच चर्चांना पाय फुटले
कराड उत्तरेतील राजकीय वातावरण सध्या भलतेच तापू लागले आहे.विद्यमान आ.बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी नक्की असून विरोधात नेमकं कोण आणि कितीजण असणार याबाबत उलटसुलट चर्चा असून अजितदादा जिल्ह्यात वाई व फलटण या दोन जागेवर समाधान मानणार की कराड उत्तरसाठी ताकत लावणार हा चर्चेचा विषय ठरला असून भाजपच्या गोटात उत्तरेत उदयदादा आम्हालाच मदत करणार अशी दबक्या आवाजात खसखस पिकली असून आ. बाळासाहेब पाटील गटाचे कार्यकर्ते शिवेंद्रबाबा आणि आ.पाटील यांची गोपनीय भेट झाली असून ’आमचं ठरलंय’असा संदेश मिळाला आहे असे प्रतिउत्तर देताना दिसत आहेत.यामुळे नवीन नेतृत्व सातारा आणि कराड तालुक्याला मिळणार की ऐनवेळी जुनेजाणते एकत्र येत पुन्हा एकदा ’हम साथ साथ है’ म्हणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दोन्ही महाराजांची भूमिका महत्त्वाची
लोकसभेला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही यामुळे आत्मविश्वास दुणावलेली भाजप आणि पदाधिकारी भलत्याच आत्मविश्वासात वावरत असल्याच्या चर्चाही मतदारांच्यात होऊ लागली आहे.कारणे काहीही असतील यामुळे बूस्टर डोस मिळालेली भाजपची नेतेमंडळी मतदारसंघात सुसाट झाली आहे. परंतु यामध्ये भाजपचे खा.उदयनराजे भोसले आणि आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका महत्वाची ठरणार असून ते सांगतील तेच तोरण आणि धोरण जिल्ह्यात तरी आखले जाणार असून दोन्ही राजे उमेदवारीसाठी आपले वजन कुणाच्या पारड्यात टाकणार ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही.नागरिकांच्यातील चर्चेनुसार आ.बाळासाहेब पाटील,खा.उदयनराजे भोसले आणि आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची लोकसभा निवडणूक काळात गोपनीय बैठक झाल्याच्या चर्चा तर धक्कादायक असल्याचा वळणावर येऊन ठेपल्या आहेत.
कारखाना ठरणार गेमचेंजर
सह्याद्री सहकारी साखर कारखाना गेल्या काही कालावधीत कराड उत्तरच्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरला आहे सर्वात जुना आणि गावागावात सभासदांचा समूहगट असणारा कारखाना विद्यमान आमदारांना आपला गट आणि गड शाबूत राखण्यात कायमच मदत करीत आला आहे.परंतु मागील काही वर्षात खाजगी साखर कारखानदारांनी आपली पाळेमुळे घट्ट रोवल्याने साखर उत्पादक बळीराजाला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.’अडवाअडवी जिरवाजीरवी’चे प्रकार कमी झाल्याने चांगली वागणूक हाच मूलमंत्र परवलीचा शब्द ठरला आहे.तरीही सहकारी तत्त्वावरील सह्याद्री,अजिंक्यतारा, कृष्णा हे साखर कारखाने दराच्या बाबतीत एकमेकांना पूरक भूमिका घेतात आणि खरी ’ग्यानबाची मेक’सुताडगूताड होण्यासाठी कारणीभूत ठरते कारण साखर कारखान्यातील न दिसणारा नफा प्रचंड मोठे अर्थकारण करणारा आहे,हे शिखर बँकेच्या चर्चित घोटाळ्यावरून जनतेच्या लक्षात आले आहे.
अजित पवारांची भूमिका गुलदस्त्यात
एके काळी जिल्ह्यावर एकछत्री अंमल असणारी काँग्रेस राष्ट्रवादीचा उदय झाल्यानंतर अस्ताला गेली तर नुकतेच अजित दादांनी बंड केल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसून जिल्ह्यातील वर्चस्व संपुष्टात आले.यामुळे शरद पवार किंवा अजित दादा या दोन्ही गटांना आपले वर्चस्व पुन्हा स्थापन करण्यासाठी जास्तीत जास्त जागा लढवाव्या लागणार असून हक्काचा खासदार भाजपच्या पदरात देऊन अजितदादांनी पायावर धोंडा मारून घेतल्याची चर्चा असून कराड उत्तर आणि कराड दक्षिण मधून मताधिक्य न मिळाल्याने यामागचे वेगळेच रहस्य थोरल्या पवारांच्या कानावर गेल्याने भाकरी करपायच्या अगोदर फिरली तर बरे असते अशी कुजबुज सुरू झाली आहे.
तीन पिढ्यांची मतमतांतरे
18 ते 25 दरम्यानची युवा पिढी हिंदुत्व मानणारी आहे यामुळे त्यांचा कल भाजपकडे असून 25 ते 40 दरम्यानची पिढी थोडी समंजस असल्याने त्यांचा ओढा रोखठोक अजित दादांच्या भूमिकेकडे आहेत तर 40च्या पुढील पिढीला शरद पवारांच्या नेतृत्वावर प्रचंड मोठा विश्वास असल्याने तीन पिढ्यांची मतमतांतरे मोठ्या प्रमाणात चर्चेत असून बेरोजगारी हा विषय किती मोठा होतो यावरच तरुणवर्ग काय भूमिका घेणार यावरच कराड उत्तरचा निकाल अवलंबून असणार आहे.कारण पाच दहा टक्क्यांचा निर्णायक टप्पा महत्वपूर्ण असणार आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या